हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील उद्योजकांसाठी घेतलेल्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये उद्योजकांचा कृतीशील सहभाग !
मुंबई – कोविड-१९ च्या कालावधीमध्ये समाजातील अनेकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’ उपक्रम घेण्यात आले. त्यात धर्मप्रेमी उद्योजक, अधिवक्ते, आधुनिक वैद्य आणि हिंदुत्वनिष्ठ जोडले गेले. या ‘ऑनलाईन’ उपक्रम मालिकेतील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील उद्योजकांसाठी ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला १०० हून अधिक उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
आरंभी काही धर्मप्रेमी उद्योजकांनी त्यांनी केलेल्या धर्मकार्याविषयी सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेले हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्य अन् त्याला ईश्वरी कृपेने मिळणारे यश यांविषयी उपस्थितांना ‘स्लाईड्स’च्या माध्यमातून अवगत करण्यात आले.
सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. मनोज खाडये यांनी केले मार्गदर्शन !
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी उपस्थितांना धर्मकार्य करत असतांना आणि एकूणच मनुष्य जीवन व्यतीत करत असतांना साधनेचे महत्त्व काय आहे, याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातचे हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. मनोज खाडये यांनी ‘धर्मकार्यातील आपले योगदान आणि कार्याची पुढील दिशा’, याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ घातलेला दुष्परिणाम याविषयी श्री. खाडये यांनी सांगितले.
विशेष अभिप्राय
१. जामनेर, फत्तेपूर येथील व्यावसायिक श्री. दिनेश शर्मा यांनी बैठकीनंतर ‘मला हलालचा विषय समजला’, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी याविषयी त्यांच्या गावातील किराणा दुकानदाराकडे विचारणा करून साहित्य पडताळले, तेव्हा त्यात हलालचे चिन्ह असलेले काही साहित्य दिसले. त्यांनी दुकानदाराचे प्रबोधन केल्यानंतर त्यानेही यापुढे असे साहित्य न घेण्याचे मान्य केले.
२. नगर येथील व्यावसायिक श्री. सारंग मंत्री यांनी हलाल प्रमाणपत्राविषयी मित्रांमध्ये जागृती करण्यास आरंभ केला आहे.