भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराचा सातारा जिल्हाभर जाहीर निषेध
सातारा, २३ मार्च (वार्ता.) – महाविकास आघाडी सरकारचे विचार एक नाहीत. हे सरकार शेतकर्यांसाठी मारक आहे. राज्याचे गृहमंत्री पोलिसांनाच १०० कोटी रुपयांचा हप्ता मागत असतील, तर हे भ्रष्ट सरकार सत्तेत रहाता कामा नये. हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करत भाजपने २१ मार्च या दिवशी जिल्हाभर विविध ठिकाणी जाहीर निषेध आंदोलने केली.
सातारा शहरातील शिवतीर्थावर (पोवई नाका) येथे भाजप शहरप्रमुख विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘अब तो ये स्पष्ट है । ये सरकार भ्रष्ट है ।’, ‘महाविकास आघाडीचा धिक्कार असो’, ‘गृहमंत्र्यांनी त्यागपत्र दिलेच पाहिजे’, ‘मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र दिलेच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. या वेळी ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. याच दिवशी कराड येथील श्री दत्त चौक येथेही भाजपच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.