लसीकरणाचा भारतीय इतिहास
देशात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. स्वतः मा. पंतप्रधानांनी लस घेऊन या टप्प्याचा प्रारंभ केला. लसीकरण ही आधुनिक वैद्यकाची देण असल्याचे आपण सर्वत्र वाचत असतो; मात्र ऐतिहासिक संदर्भ पाहिल्यास एक वेगळेच सत्य आपल्यासमोर येते. आयुर्वेदात सर्पविषाच्या उपचारांत डोक्यावर काकपद छेद घेऊन थेट रक्तप्रवाहात औषध सोडावे, असे वर्णन आढळते. सूचीभरण रस अर्थात् सुईने टोचायच्या औषधांचे वर्णनही काही आयुर्वेदाच्या ग्रंथांत आलेले आहेत. कौटिलीय अर्थशास्त्रात वर्णित ‘विषकन्या’ प्रकरणही लसीकरणाच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित असलेलेच आहे. केवळ साहित्यिक संदर्भच नव्हे, तर भारतियांना प्राचीन काळापासूनच लसीकरण हा उपाय ज्ञात होता आणि त्याचे प्रचलनही भारतात होते, हे दाखवणारे ऐतिहासिक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. देवीच्या रोगाला आयुर्वेदात ‘शीतला’ असे म्हटले असून त्याचे वर्णनही आयुर्वेदात सापडते. विशेषतः बंगाल ते नेपाळ या प्रदेशात शीतलेच्या उपचारांचे समकालीन संदर्भ आढळतात.
भारतात वर्ष १७५४ पूर्वीपासून लस देण्याची प्रक्रिया चालू असणे
वर्ष १७५४ मध्ये रेव्हरंड चार्ल्स काईस यांनी त्यांच्या डी. अॅम्सटरडॅम नामक भारतात वास्तव्य केलेल्या मित्राला याविषयी विचारणा केली असता बंगाल प्रांतात शुद्ध केलेले काटे आणि काही पट्टबंधाच्या साहित्यासह देवीची लस तेथील रहिवासी देत असल्याची माहिती त्याने दिली. आपल्या परिचयाच्या एका ब्रिटीश महिलेने आपल्या मुलांना ही लस दिल्याची माहितीही त्याने नमूद केल्याचे रेव्हरंड चार्ल्स यांनी आपले पुस्तक ‘Essai Apologetique’ मध्ये नमूद केले आहे. अमेरिकन डॉक्टर जेम्स कर्कपॅट्रिक यांनी ‘An analysis of inoculation’ या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात नमूद केले आहे; मात्र त्यातही ‘याचे श्रेय स्थानिक चिकित्सकांचे नसून त्या ब्रिटीश महिलेचे आहे, जिने आपल्या मुलांवर हे प्रयोग करू दिले’, अशी मखलाशी करायला डॉ. जेम्स विसरलेले नाहीत ! १० फेब्रुवारी १९३१ या दिवशी डॉ. ऑलिव्हर कॉल्ट नामक ब्रिटीश डॉक्टर असे लिहितो की, किमान १५० वर्षांपासून बंगाल सुभ्यातील ब्राह्मणांकडून तेथील रहिवाशांना देवीची लस दिली जाते. तिला स्थानिक भाषेत ‘टिका’ आणि आजही लसीला हिंदीत ‘टिका’ असेच म्हटले जाते.
देवीच्या लसीच्या शोधाआधी भारतात ती दिली जात असणे
वर्ष १७९७ मध्ये एडवर्ड जेन्नरने देवीवरील लस शोधली आणि क्रांती घडल्याचे आपण वारंवार वैज्ञानिक साहित्यात वाचतो. त्यांचे श्रेय नाकारण्याचा प्रश्न नाही. प्रत्यक्षात मात्र त्यापूर्वीपासूनच भारतात देवीचे लसीकरण केवळ ज्ञातच नव्हे, तर चालूही असल्याचे वरील समकालीन संदर्भ उपलब्ध आहेत. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते, याचे हे प्रमाणच नव्हे काय ? हे सारे संदर्भ नमूद करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियास्थित लेखिका मित्रा देसाई यांचे येऊ घातलेले ‘शीतला’ हे इंग्रजी पुस्तक होय. प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक वाचण्याचे भाग्य लाभलेल्या काही मोजक्या वाचकांपैकी मी एक !
भारतीय संस्कृती आणि त्यातील पुरातन शोध यांविषयी प्रयत्न करणार्या मित्रा देसाई !
लेखिका मित्रा देसाई या मूळच्या साताराच्या रहिवासी. त्या विवाहानंतर कोल्हापुरात स्थायिक झाल्या. कायदा, क्रिमिनल जस्टिस, इंटिरियर डिझाईन अशा विषयांमध्ये पदव्या घेऊन विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवणारे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व अशी त्यांची ओळख करून देता येईल. भारतीय संस्कृती आणि त्यातील पुरातन शोध यांचा अभ्यास करता करता हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत कसे पोचता येईल, याचा लेखिकेने ध्यास घेतला. ‘तेजोमाया भारत’ नावाचे संकेतस्थळ आणि यू ट्यूब चॅनेलद्वारे लेखिकेने छोट्या अन् मोठ्या गोष्टी ‘पॉडकास्ट’, व्हिडिओ आणि लेखांद्वारे लोकांपुढे मांडायला प्रारंभ केला. त्यांनी प्रारंभी छोट्या छोट्या गोष्टी सांगत थेट ‘शोध सुश्रुताचा’ या मालिकेपर्यंत मजल मारली. महाभारताचे गाढे अभ्यासक नीलेश ओक यांच्यासह अभ्यास करून लेखिकेने आयुर्वेदाच्या शल्यतंत्राचे धुरंधर महर्षि सुश्रुत यांच्यावर १० भागांची एक मालिका गोष्ट स्वरूपात मांडली. अत्यंत क्लिष्ट विषय अतिशय सोप्या शब्दांत आणि तोही गोष्टी रूपाने व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्याने श्रोत्यांना खूप आवडला. यानंतर देसाई यांनी विविध विषय हाताळत लोकांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची समाजमाध्यमांद्वारे ओळख करून देण्याचा सपाटाच लावला ! विशेष म्हणजे लेखिका ऑस्ट्रेलियामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात. त्याच वेळी ‘हिंदु कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया’, ‘हिंदु रेसोनान्स फोरम’, ‘हिंदु स्वयंसेवक संघ कॅनबेरा’ अशा विविध संघटनांमध्ये काम करत असतांनाच भारताविरुद्ध विनाकारण चुकीची माहिती प्रसृत करणार्यांचा खरपूस समाचार घेण्याचे काम, त्या आपल्या ‘ब्लॉग’ किंवा लेखाद्वारे करत असतात.
भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची माहिती देणारे ‘शीतला’ पुस्तक !
मित्रा देसाई यांचे नवीन पुस्तक म्हणजेच ‘Shitala : How India enabled vaccination’. या पुस्तकातून भारतामध्ये लसीकरणाचे तंत्रज्ञान किती पुरातन आहे, याची आश्चर्यचकित करणारी माहिती रोचक पद्धतीने मिळते. भारतात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी शिकायला न जाता येणार्या आणि घरी अडकून पडलेल्या तारा नामक युवतीच्या आपल्या ‘आयुर्वेदतीर्थ’ आजोबा नानांशी होणार्या संवादातून ही गोष्ट उलगडत जाते. तुम्हा आम्हाला पडणारे अनेक प्रश्न ताराला पडले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊन गेली, तरी आपण काहीच प्रगती कशी केली नाही ? एवढी मोठी महामारी (पॅनॅडॅमिक) थोपवण्यासाठी आपल्याकडे कसलीच व्यवस्था नसतांना भारताने किंवा आयुर्वेदाने लसीकरणाविषयी आपल्याला माहिती असल्याच्या फुशारक्या मारायच्या का? अशा एक नाही अनेक प्रश्नांची हळूवार उत्तरे देत आणि ताराला संशोधनाची गोडी लावत, तिच्यासमोर समकालीन संदर्भ ठेवत आयुर्वेदतीर्थ नाना तिच्याशी जो हळूवार संवाद साधतात, तो लेखिकेने ओघवत्या भाषेत मांडला आहे. इतिहासाशी फारकत न घेता संदर्भांची योग्य मांडणी करत लेखिकेने तो रोचकपणे मांडला आहे.
आयुर्वेदातील लसीकरण संकल्पनेचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक !
असे असले, तरी यानिमित्ताने केवळ इतिहासात रममाण न होता आयुर्वेदातील लसीकरण संकल्पनेचे पुनरुज्जीवन व्हायला हवे, असे एक वैद्य म्हणून वाटते. आजही अशा प्रयोगांना आपल्या देशात विविध ‘ऐथिकल कमिटी’कडून (नैतिक समितीकडून) अनुमती मिळत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. आयुर्वेदाच्या औषधी उत्पादकांचे जीव तुलनेत लहान असल्याने तेही कमी पडतात; मात्र हे चित्र प्रयत्नपूर्वक पालटावे लागेल. तसे होण्यासाठी आयुर्वेदाची समाजाला प्रेरणा आणि भारतियांना जनजागृती म्हणून ‘शीतला’सारखी पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. नीलेश ओक, मित्रा देसाई आणि संकेत कुलकर्णी यांसारखे अभ्यासक विदेशांत राहून भारतियांच्या माना ब्रिटिशांनी लादलेल्या गैरसमजांच्या जोखडातून मुक्त करत आहेत.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली
(संदर्भ : तरुण भारत)