आदर्श गुरुसेवेचा वस्तूपाठ म्हणजे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज !
सनातनचे प्रेरणास्थान असलेले प.पू. रामानंद महाराज यांची २४ मार्च या दिवशी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…
संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासमवेत संपूर्ण जीवन सावलीसारखे राहून त्यांची अविश्रांत सेवा करणारे आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांची आज ७ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचा अलौकिक जीवनपट संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.
प.पू. रामानंद महाराज यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री. रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर ! रामजीदादांचा जन्म २० ऑक्टोबर १९२४ या दिवशी नाशिक येथे झाला. त्यांचे शिक्षण मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यातील गरोठ आणि नंतर इंदूर येथे झाले. वर्ष १९४२ मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या गरिबीमुळे त्यांना नोकरी करावी लागली.
१. प.पू. रामजीदादांनी केलेल्या वेगवेगळ्या नोकर्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केलेले कार्य !
वर्ष १९४२ ते ४६ या काळात त्यांनी नाशिक जवळील देवळाली येथे मिलिटरी इंजिनियरींग सर्व्हिसमध्ये नोकरी केली. वर्ष १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले. दादांनी वर्ष १९४८ ते १९६४ या काळात संघाचे पुष्कळ कार्य केले. वर्ष १९४९ मध्ये दादांनी इंदूर येथील ‘गव्हर्न्मेंट प्रेस’मध्ये नोकरी पत्करली. ऑक्टोबर १९८२ मध्ये त्यांना रीतसर निवृत्ती मिळाली; मात्र या ३३ वर्षांच्या काळात नोकरीत असूनही त्यांना गुरुसेवेत कधीही काहीसुद्धा अडचण जाणवली नाही.
२. हसतमुख आणि स्थितप्रज्ञ स्वभाव !
‘रामजीदादा लहानपणापासूनच स्वभावाने शांत, अत्यंत प्रेमळ, मृदू; पण मितभाषी होते. राग जणू त्यांना ठाऊकच नाही. ते नेहमी हसतमुख असत. ‘बाबा दादांना खूप बोलायचे, अगदी टाकून बोलायचे आणि तेसुद्धा सगळ्यांच्या समोर, मग त्यांची चूक असो कि नसो. दादांवर कधी परिणाम दिसला नाही कि कपाळावर आठ्या दिसल्या नाहीत. त्यांची निर्विकारपणे सेवा चालू. सेवेत कधीही खंड पडला नाही. शिव्या आणि पुष्पवृष्टी त्यांच्या लेखी सारखेच होते. बाबा एकदा एका भक्ताला म्हणाले, ‘‘मी रामजीला स्थितप्रज्ञ बनवलंय, म्हणूनच माझ्या तोंडून वर्षाव व्हायला लागला की, दादा स्थितप्रज्ञतेची छत्री उघडून शांतपणे उभे रहातात.’’
३. गुरुप्राप्ती
ऑक्टोबर १९५६ मध्ये रामजीदादा एका मित्राच्या सांगण्यावरून पत्नी (सौ. आक्का) समवेत एका संतांच्या दर्शनासाठी गेले. हे संत म्हणजेच त्यांचे गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश ! त्याच मासात गुरूंचे चरण रामजीदादांच्या घरी प्रथम लागले. काही आठवड्यांतच गुरु बर्याचदा घरी यायला लागले. मग गुरूंचे वास्तव्य रामजीदादांच्या घरीच झाले. समवेत दिनू (संत भक्तराज महाराज) होतेच. आता मात्र प्रतिदिन भजन आणि भंडारे यांची रेलचेल चालू झाली !
४. प.पू. बाबांची केलेली अविश्रांत सेवा !
‘प.पू. श्री साईश यांच्या देहत्यागानंतर दादा प.पू. बाबांच्या बरोबर सावलीसारखे असायचे, मग ते इंदूरात, महाराष्ट्रात, देहलीला असोत कि विशाखापट्टणम्ला असोत. दादांना विश्रांती मिळायची फक्त भजनात. झांज वाजवावी तर दादांनीच. एका बाजूला बसून झांज वाजवायची आणि भजन म्हणायचं. तेसुद्धा तासन्तास. एरव्ही स्वस्थता नाहीच.’ – श्री. दादा दळवी
बाबांच्या मुखातून निघालेला शब्द झेलण्यासाठी दादा तन-मनाने दक्ष असत. बाहेरगावी जाणे असो किंवा भजनाला जाणे असो. त्यांनी रात्र पाहिली नाही कि दिवस. सतत सेवाव्रतधारीप्रमाणे अटल. बाबांचे तर फक्त भजन, पण दादा म्हणजे नोकरी आणि भजन दोन्ही ! दादा सदैव तत्पर ! गुरुनिष्ठा आणि गुरूंवरचे प्रेम शिकायचे, तर ते बाबांसमवेत सावलीसारखे राहून, त्यांची सेवा करणार्या दादांकडून शिकता येईल.
‘गुरुसेवा आणि गुरु चिंतनात सतत असल्यामुळे दादांना आपल्या कुटुंबाकडे बघायला वेळ तर नसायचाच; पण सेवेत मग्न असतांना आठवण तरी व्हायची कि नाही, कोणास ठाऊक ! बाबा म्हणायचे, ‘‘हा कुटुंबाची चिंता करत नाही, त्यांना काही हवे नको पहात नाही, म्हणून मला त्यांची काळजी करावी लागते.’’ – श्री. दादा दळवी
५. आदर्श शिष्य
अ. वर्ष १९५६ ते १९९५ पर्यंत, सतत ४० वर्षे रामजीदादा सावलीप्रमाणे बाबांसमवेत होते. तन-मन-धन या सर्वांचा त्याग शिष्याने कसा करायचा असतो, याचे मूर्तीमंत रूप म्हणजे रामजीदादा.
आ. बाबांना कुणी काही अर्पण केले की बर्याचदा दादांनाही अर्पण करत. दादा त्या वस्तू, पैसे इत्यादी सर्व बाबांनाच देत.
इ. प.पू. बाबांचा शब्द, आज्ञा प्रमाण मानून निवांतपणे परिपालन करायचे, बिनतक्रार, बिनाप्रतिक्रिया आज्ञेचे पालन कसे करावे, याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे दादा.
६. प.पू. रामानंद महाराज
खडतर सेवेमुळे, वर्ष १९८७ मध्ये मोरटक्का आश्रमात झालेल्या विष्णुयागाच्या वेळी बाबांनी दादांचे नामकरण ‘रामानंद’ असे केले आणि त्यांना भाऊ बिडवईंसह उत्तराधिकारी केले. आमच्याशी बोलतांना दादांच्या अवस्थेचे वर्णन बाबांनी ‘स्थितप्रज्ञ’ असे केले आहे. अध्यात्माच्या अभ्यासकाला स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणती ?, ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम ॥ (श्रीमद्भगवद्गीता २.५४)’, हे समजण्यासाठी गीतेचा अभ्यास करायला नको, तर दादांच्या जीवनाचा केला, तर ते चटकन् समजेल.
७. स्वतः गुरूंनी केलेला गौरव
अ. ‘भक्तराज अनेक होतील; पण रामजी होणे कठीण आहे.’ याचा अर्थ असा की, महाराज म्हणून वावरणे सोपे आहे; पण सातत्याने शिष्य म्हणून सेवा करणे कठीण आहे.
आ. अमृत महोत्सवाच्या पहाटे बाबांनी कु. सीमा आणि श्री. भोसेकर यांना सांगितले, ‘‘रामजीला नमस्कार केला की मला पावतो.’’
प.पू. बाबांची जन्मभर सावलीप्रमाणे राहून सेवा करणारे प.पू. रामजी दादा यांनी सुद्धा शेवटपर्यंत प.पू. बाबांचे आज्ञापालन करत भक्तांना आणि समाजाला साधना अन् अध्यात्माचे महत्त्व सांगितले. त्यांनी फाल्गुन शुक्ल पक्ष दशमीला (११ मार्च २०१४ या दिवशी) देह ठेवला.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘संत भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव, देहत्याग व उत्तराधिकारी’