‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे शिकवून त्याची अनुभूती देणार्या परात्पर गुरुदेवांच्या चरणी श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन !
‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, हे शिकवून त्याची अनुभूती देणार्या परात्पर गुरुदेवांच्या चरणी सातारा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश दीक्षित (वय ७१ वर्षे) यांनी केलेले आत्मनिवेदन !
हे गुरुदेवा,
आपल्या चरणी वंदन करून लिहिण्याचा प्रयत्न करतो.
१. रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळणे; पण काही कारणामुळे आश्रमात येता न येणे, त्यानंतर अपघात होऊन पायाचे शस्त्रकर्म करावे लागणे आणि ‘या अपघातापासून वाचवण्यासाठीच आश्रमात येण्याची संधी मिळाली होती’, हे लक्षात येणे
ऑक्टोबर २०१८ मध्ये आम्हाला रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली होती. त्याच वेळी आम्ही निघण्याचे ठरवले होते; परंतु काही कामांमुळे ते राहिले. त्यानंतर माझे रामनाथी आश्रमात येण्याचे नियोजन झाले नाही.
हे गुरुदेवा, पुढे डिसेंबर २०१८ मध्ये माझा अपघात होऊन माझ्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागले. ‘या अपघातापासून वाचवण्यासाठीच मला आश्रमात येण्याची संधी मिळाली होती’, हे माझ्या लक्षात आले. आपण माझ्यावर पूर्वीपासून, म्हणजे वर्ष १९९६ पासून आजपर्यंत अखंड प्रीती करत आहात. ती मी अनुभवत आहे. ‘या वेळी माझा भाव न्यून पडला’, याची मला खंत वाटत आहे.
२. गुरुदेवांनी काही साधकांना सातारा येथे पाठवून ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असा संदेश देणे, त्या वेळी दैवी सुगंधाची अनुभूती येणे आणि तेव्हापासून बुद्धीने विचार करणे सोडून देऊन अध्यात्मशास्त्राच्या कृतीमधूनच देवाला पाहू लागणे
हे गुरुदेवा, वर्ष १९९६ – १९९७ मध्ये आपली भेटही झाली नव्हती. आपण आपला संदेश देऊन काही साधकांना प्रसारासाठी सातारा येथे पाठवले होते. त्यांनी मला आपला संदेश दिला, तो म्हणजे ‘अध्यात्म हे शास्त्र आहे. इतर सर्व शास्त्रांप्रमाणे या शास्त्रामध्येसुद्धा कृती आहेत.’ ‘मी केवळ एकच पाऊल पुढे टाकले’, असे म्हणण्यापेक्षा ‘आपल्या कृपेनेच पाऊल पडले’, असे म्हणावे लागेल. त्यानंतर आपणच मला कितीतरी पावले पुढे घेऊन गेलात. त्याच वेळी आपण मला अमूल्य भेट दिली. ती म्हणजे मला मध्यरात्री ३ वाजता दैवी सुगंध आला. त्यात मी पूर्णपणे बुडून गेलो. मी त्या सुगंधाचा उगम शोधू लागलो. मी संपूर्ण घरात आणि घराच्या बाहेरसुद्धा शोध घेतला; परंतु त्याचा उगम कुठेही मिळाला नाही. नंतर माझ्या लक्षात आले, ‘सुगंध केवळ एकाच खोलीत आहे.’ हे गुरुदेवा, त्या दिवसापासून मी बुद्धीने विचार करणे सोडून दिले आणि मी अध्यात्मशास्त्राच्या कृतीमधूनच देवाला पाहू लागलो.
३. सभेसाठी कराडला जाण्यास निघणे, त्या वेळी वाईमधील सत्संगाचे नियोजन झालेले नसल्याने मनःस्थिती द्विधा होणे, परात्पर गुरुदेवांचे ‘दर्शनापेक्षा सेवा महत्त्वाची !’, हे वचन आठवून सेवेला प्राधान्य देणे
श्री गुरुदेव, त्यानंतर आपली प्रत्यक्ष भेट कराड येथील सभेच्या वेळी झाली. तीसुद्धा आपण सांगितलेल्या अध्यात्माच्या कृतीमुळेच ! आपण सांगितले होते, ‘‘श्री गुरूंच्या दर्शनापेक्षा सेवा अधिक महत्त्वाची !’’ कराड येथील सभेच्या दिवशी सातारा येथून आम्ही सर्व जण, तसेच वाई आणि कोरेगाव येथील सर्व साधक कराडला जाण्यास निघालो. मीसुद्धा कराडला जाण्यासाठी गाडीत बसलो होतो; परंतु ‘वाईमधील सत्संगाचे नियोजन झालेले नव्हते’, असे मला समजले. माझी मनःस्थिती द्विधा झाली. त्या वेळी एकीकडे आपल्या भेटीची आतुरता आणि दुसरीकडे आपण सांगितलेले ‘दर्शनापेक्षा सेवा महत्त्वाची !’ हे वचन होते. मी आपण सांगितल्याप्रमाणे सेवेला महत्त्व दिले आणि गाडीतून उतरून तसाच वाईला गेलो.
४. सत्संग घेण्याची सेवा झाल्यावर गुरुदेवांच्या भेटीसाठी डोळ्यांतून अश्रू येऊ लागणे, त्याच वेळी एका साधकाने येऊन परात्पर गुरुदेवांनी आठवण काढल्याचे सांगून कराडला बोलावल्याचा निरोप देणे, डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागणे आणि परात्पर गुरुदेवांचे सर्वश्रेष्ठत्व अनुभवता येणे
सत्संग झाल्यावर मी देवासमोर बसून देवालाच विचारत होतो, ‘‘हे मुरलीधरा, (ते मुरलीधराचे देऊळ होते.) माझे काही चुकले का ?’’ त्या वेळी आपल्या भेटीसाठी डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. हे गुरुदेवा, आपण त्याच वेळी माझी आठवण काढली आणि कराड येथे आपण विचारलेत, ‘‘दीक्षित कुठे आहेत ?’’ मी देवळात देवासमोर बसलो होतो. तिथे एक साधक निरोप घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला लगेच कराडला बोलावले आहे.’’ माझा आनंद गगनात मावेना. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. मी तसाच वाईहून कराडला आलो. तेव्हापासूनच आपले सर्वश्रेष्ठत्व मला अनुभवायला मिळत आहे. हे भाग्य आपल्या कृपेमुळेच मला लाभले आहे.
५. दुचाकीवरून प्रवास करतांना दमल्याने डोळा लागणे, जाग आल्यावर पुढे बरेच अंतर सुखरूप गेल्याचे लक्षात येणे आणि त्या वेळी ‘गुरुदेवांनीच सांभाळले’, याची जाणीव होणे
हे गुरुदेवा, वर्ष २००० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीच्या वितरण सोहळ्याच्या वेळी आपण मला सेवा दिली. त्या वेळी चार मास मी सिंधुदुर्ग येथे होतो आणि परत जातांना जेव्हा आपल्याला भेटायला यावयाचे होते, त्या वेळी पुष्कळ काही शिकण्यास मिळाले. त्या वेळी माझे दोन दिवस जागरण झाले होते आणि मला लगेच निघावयाचे होते. दुचाकीवरील प्रवास होता. झोप अनावर होती. कुठेतरी थांबून विश्रांती घेण्याचा विचार मनामध्ये असतांनाच ‘डोळा केव्हा आणि किती वेळ लागला ?’, हे मला कळलेच नाही. जाग आली, तेव्हा लक्षात आले की, आपण काही अंतर सुखरूप आलो आहोत. मी लगेच गाडी थांबवली आणि झाडाखाली विश्रांती घेतली. त्या वेळी आपल्याच कृपेने माझे रक्षण झाले.
६. टेम्पो दरीत जातांना परात्पर गुरुदेवांच्या कृपेने रक्षण झाल्याची आलेली अनुभूती !
हे गुरुदेवा, मी टेम्पो घेऊन सातारा येथून रत्नागिरीला येत होतो. तेव्हा संगमेश्वरजवळ माझी गाडी दरीत जात होती. त्या वेळीही आपल्याच कृपेने मी वाचलो. ‘गाडी खोल दरीत जात असतांना आपण आपल्या पोलादी हातांनी मला छातीशी घट्ट धरले आहे’, असे मला जाणवले. तो हात मला स्पष्ट पहाण्यास मिळाला. हे गुरुदेवा, मला आश्वस्त करण्यासाठीच आपण आपला हात पोलादी केला होतात ना ! त्यानंतर मी आश्वस्त झालो. ‘मला आता काही होणार नाही’, याची निश्चिती झाली आणि खरोखरच गाडी पुष्कळ मोठ्या दरीत न जाता २० – २२ फूट दरीत जाऊन थांबली. त्यापुढे मोठी खोल दरी होती. ते ठिकाण असे होते की, त्या ठिकाणी दुसरी कोणतीही गाडी इतकी अलगद जाऊन स्थिर झाली नसती. गाडी थांबल्यावर मला वाटले, ‘मी खोल दरीत आलो आहे’; कारण पडतांना तसे जाणवले होते; परंतु नंतर मला वरून गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि दिव्यांचा प्रकाश दिसला. तेव्हा मला कळले, ‘आपण खोल दरीत नसून मार्गापासून २० ते २५ फुटांवर आहोत.’
मी कसाबसा झाडा-झुडपांना धरून वर आलो. तेव्हा वर एक जण थांबले होते. त्यांनी मला विचारले, ‘‘थोड्या वेळापूर्वी येथून गाडी खाली गेली, ती आपलीच का ?’’ ते आश्चर्याने माझ्याकडे पहात होते. ते मला म्हणाले, ‘‘या ठिकाणी जो खाली गेलेला आहे, तो सहसा परत आलेलाच नाही आणि आपण तर वर चढून आलात, आश्चर्य आहे !’’ खरोखरच प्रत्यक्ष मरणाच्या दारातून आपण मला बाहेर काढले. मी खाली जातांना त्याने पाहिले होते. गाडी थांबवून त्याने आपल्या ३ – ४ मित्रांना दूरभाष करून बोलावले होते. त्यांनी माझी विचारपूस करून माझी त्यांच्या एका मित्राच्या लॉजवर सोय केली. ‘तुम्ही काही काळजी करू नका’, असे त्यांनी मला सांगितले. त्यांच्यापैकी एक जण आधुनिक वैद्य होते. त्यांनी मला वेदनाशामक गोळ्या दिल्या आणि लॉजच्या मालकांना सांगितले, ‘‘झोपण्याची व्यवस्था करून कुणाला तरी त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगा.’’ आपल्याच कृपेने माझी सगळी सोय झाली. त्या वेळीसुद्धा ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, या आपल्या वचनाची मला अनुभूती आली. आपल्याच कृपेने माझ्याकडून ती कृती होत होती. मी गाडीची भावपूर्ण शुद्धी करत होतो. आपल्याच कृपेने मला आपले आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र अन् श्रीकृष्णाचे चित्र खिशात ठेवण्याची बुद्धी झाली. हे गुरुदेवा, जेव्हा गाडी थांबली, तेव्हा अंधारात पाहिले, तर त्या छायाचित्रांचे फोल्डर माझ्या हाती लागले. त्या वेळी मला भावाश्रू आवरेनात.
७. गुरुदेवांना भेटण्यासाठी सातारा-पुणे महामार्गावर उभे असतांना एका मोटारसायकलवाला अंगावर आल्याने अपघात होऊन मांडीचे हाड मोडणे आणि अशा स्थितीतही परात्पर गुरुदेवांचे दर्शन घेता येणे
हे गुरुदेवा, वर्ष २००२ मध्ये आपण सातारा-पुणे महामार्गावरून जाणार होता. तेव्हा आम्ही आपणाला सातारा महामार्गावर भेटावयास येणार होतो. त्या दिवशी मी रस्त्याच्या डाव्या बाजूला दैनिक वितरणाअंतर्गत दैनिकाच्या अंकांचे विभागवार वर्गीकरण करत होतो. तेव्हा एक मोटारसायकलवाला त्याच्या चुकीच्या दिशेने वेगात माझ्या अंगावर आला. त्या वेळी मी त्याच्याकडे पहात होतो. तेव्हा ‘तो माझ्यावर आक्रमण करण्यासाठीच येत होता’, असे मला जाणवले. त्याही परिस्थितीत आपल्या दर्शनाचा लाभ घेण्यास मला कुणी रोखू शकले नाही. माझे मांडीचे हाड मोडले होते; पण त्याही परिस्थितीत मी महामार्गावर येऊन आपले दर्शन घेऊ शकलो, ते केवळ आपल्या कृपेमुळेच !
८. घराच्या बांधकामाच्या वेळी तांत्रिक आणि व्यावहारिक भागही गुरुदेवांना आवडेल, असा करण्याचा प्रयत्न केल्याने त्रास देणार्या लोकांना काही करता न येणे
‘आपली प्रत्येक कृती भावपूर्ण असावी’, असे आपण आपल्या मार्गदर्शनात सांगितलेले लक्षात ठेवून घराच्या बांधकामापूर्वी मी ८ – १० ठिकाणी जाऊन बांधकामाचा अभ्यास केला. आपल्याच कृपेने तो विचार माझ्या मनात आला. ‘तांत्रिक आणि व्यावहारिक भागसुद्धा आपल्याला कसा आवडेल ?’, असा विचार माझ्याकडून झाला. त्याचा परिणाम असा झाला की, जे कुणी मला त्रास देऊ पहात होते, त्यांनासुद्धा काही करता आले नाही.
९. मुलीच्या विवाहाच्या वेळी गुरुदेवांचे सूक्ष्मातील अस्तित्व अनुभवणे आणि त्यांच्या कृपेने विवाह पार पडल्याची अनुभूती येणे
हे गुरुदेवा, आपण म्हणता, ‘‘विनायकसारखा (श्री. विनायक आगवेकर यांच्यासारखा) जावई मिळाला, छान झाले !’’ परंतु मंजिरीचा विवाह आपल्या कृपेनेच पार पडला. तिचा विवाह ठरल्यापासून प्रत्येक ठिकाणी मी आपले सूक्ष्मातील अस्तित्व अनुभवत होतो. विवाहाला आलेले सर्व जण म्हणत होते, ‘‘असा विवाहसोहळा आम्ही पहिल्यांदाच अनुभवला.’’ सगळीकडे चैतन्य आणि आनंद जाणवत होता.
– श्री. प्रकाश बाळकृष्ण दीक्षित, सातारा (२.३.२०१९)
श्री. प्रकाश दीक्षित यांना रामनाथी आश्रमातील साधकांमध्ये जाणवलेला पालट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. रामनाथी आश्रमातील साधकांमध्ये जाणवलेला पालट
‘पूर्वी आश्रमातील साधकांकडे पाहिल्यावर ‘त्यांच्या मनात बरेच विचार आहेत’, असे जाणवत होते. या वेळी रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांच्या मनात साधनेविषयीचे विचार वाढल्याचे जाणवले, तसेच त्यांच्या आनंदामध्ये वाढ झाल्याचे जाणवते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वेळोवेळी दर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. वर्ष २००२ पासून ३ – ४ वेळा गुरुदेवांच्या दर्शनाचा योग आला. तेव्हा त्यांंच्या शरिराभोवती प्रकाशाच्या कडा दिसायच्या आणि ते चालायला लागले की, त्यांच्या समवेत तो प्रकाश असायचा.
आ. एकदा त्यांच्या शरिरातून सोनेरी प्रकाश निघून शरिराभोवती स्थिर झालेला दिसला.’
– श्री. प्रकाश बाळकृष्ण दीक्षित, सातारा (२.३.२०१९)
परात्पर गुरुदेवांना केलेले भावपूर्ण आत्मनिवेदन !अ. ‘हे गुरुदेवा, देवाने माझ्या सर्वच अपघातांत माझी शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक काळजी घेतली आहे. हे केवळ देवाच्या कृपेनेच होऊ शकते. एवढे वात्सल्य केवळ आपल्या ठायीच पहावयास मिळते. आ. हे गुरुदेवा, आम्हाला या घोर कलियुगात ‘आनंदी कसे रहायचे ?’, हे तुम्ही शिकवले आहे. आपल्याच कृपेने आमच्यामध्ये भाव निर्माण होतो आणि आम्ही प्रीतीसागरात नहातो. तेसुद्धा थोड्याशा भावाच्या बदल्यात ! सर्व काही अजबच आहे. इ. हे गुरुदेवा, मला तर काहीसुद्धा येत नाही; परंतु सभा असो, गुरुपौर्णिमा असो, मंजिरीचा विवाह असो, नाहीतर बांधकाम असो, मी यांतील काहीच केले नाही. ‘केवळ आपल्याला कसे आवडेल ?’, असा विचार माझ्या मनात असायचा आणि तशी कृती माझ्याकडून होत गेली. त्या बदल्यात आपण मला भरभरून आनंद दिला. ई. हे गुरुदेवा, आपण चैतन्य आणि आनंद यांची उधळण करत असता. आम्हीच ते घेण्यास न्यून पडतो. आम्हाला आपले चैतन्य ग्रहण करता येऊ दे आणि सदैव आनंदात रहाता येऊ दे. आमच्यामध्ये अल्पसंतुष्टता न रहाता सतर्कता येऊ दे आणि आपण सर्व स्तरांवर खुल्या केलेल्या ज्ञानाच्या भांडारातील ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता आपणच आमच्यात निर्माण करा. उ. हे गुरुदेवा, आम्हा साधकांची प्रगती होण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही जे कार्य करत असता, त्याची जाणीव आमच्या मनामध्ये सतत जागृत राहू दे. ऊ. हे गुरुदेवा, ‘आम्हा साधकांची प्रगती आपणामुळेच होत आहे. आपले अस्तित्वच सर्वकाही करत आहे’, हे आम्ही अनुभवत आहोत. ए. हे गुरुदेवा, आपली कृपा संपादन करण्याचे बळ तुम्हीच आम्हाला देऊ शकता. ‘आपणच आमच्यामध्ये आपल्या कृपा घेण्यासाठीची पात्रता निर्माण करा’, ही आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो. ऐ. हे गुरुमाऊली, आपण आम्हाला न संपणार्या आठवणी आणि अनुभव यांची कायमस्वरूपी पुरेल अशी जी शिदोरी दिली आहे, ती कशी विसरायला होईल ? ओ. हे गुरुदेवा, आपल्या कृपेने माझ्या हृदयात जी भावपुष्पे निर्माण होत असतात, तीच मी आपल्या चरणांवर अर्पण करतो. |
॥ श्री गुरुचरणार्पणमस्तु ॥
श्री. प्रकाश बाळकृष्ण दीक्षित
|