भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीपूर्वी त्यांच्या सहकार्यांनी त्यांची घेतलेली अखेरची भेट !
२३ मार्च २०२१ या दिवशी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा बलीदानदिन आहे. यानिमित्ताने….
‘भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या जहाल क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी त्यांच्यासमवेत कटामध्ये सामील असलेले शिवकर्मा, जयदेव कपूर आणि इतर सहकारी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेप झालेल्या या मंडळींना ती शिक्षा भोगण्यासाठी दुसर्या तुरुंंगात नेण्यात येणार होते. तेव्हा तुरुंंगातील वरिष्ठ अधिकार्यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची शेवटची भेट घेण्याची त्यांना अनुमती दिली.
त्या भेटीत जयदेव कपूर यांनी भगतसिंगांना विचारले, ‘‘तुम्हाला फाशी देण्याचे ठरले आहे. अशा वेळी ऐन तारुण्यात, मृत्यूला सामोरे जातांना तुम्हाला वाईट वाटत नाही का ?’’ तेव्हा भगतसिंग हसून म्हणाले, ‘‘अरे ! माझ्या प्राणांच्या बदल्यात ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा हिंदुस्थानच्या कानाकोपर्यात पोचवण्यात मी यशस्वी झालो आहे आणि हेच मी माझ्या प्राणांचे मूल्य समजतो. आज गजाआड असलेल्या माझ्या लक्षावधी बांधवांच्या तोंडून मी हीच घोषणा ऐकत आहे. इतक्या लहान वयात याहून अधिक मूल्य कोणते असू शकते ?’’ त्यांच्या तेजस्वी वाणीने सर्वांचेच डोळे पाणावले. त्यांनी कसेबसे हुंदके आवरले. तेव्हा त्यांची अवस्था पाहून भगतसिंग म्हणाले, ‘‘मित्रांनो, ही भावनावश होण्याची वेळ नाही. माझा प्रवास तर संपलाच आहे; पण तुम्हाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला खात्री आहे की, तुम्ही दमणार नाही, हार मानणार नाही आणि थकून बसणारही नाही.’’
त्या शब्दांनी त्यांच्या सहकार्यांना अधिकच हुरूप आला. त्यांनी भगतसिंगांना ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू’, असे आश्वासन दिले आणि ती भेट संपली. त्यानंतर भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलीदानाने हिंदुस्थानवासियांच्या मनातील देशभक्तीची ज्योत अधिक प्रखरतेने धगधगू लागली.’
(‘साप्ताहिक जय हनुमान’, १३.२.२०१०)