फाटक्यांचे वैचारिक दारिद्य्र !
हिंदु संस्कृतीनुसार फाटके वस्त्र परिधान करणे चुकीचे मानले जाते. फाटके कपडे घालणे हे मांगल्याचे प्रतीक होत नाही. ते शुभही मानले गेलेले नाही. अध्यात्मशास्त्रानुसार अशा कपड्यांमुळे अनिष्ट स्पंदने निर्माण होतात आणि त्याकडे वातावरणातील अनिष्ट स्पंदने आकृष्ट होऊन कपडे घालणार्याला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणताही हिंदू अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती असल्याखेरीज कधीही फाटके कपडे घालत नाही. फाटके कपडे घालणे हे द्रारिद्य्राचे लक्षणही मानले जाते. त्यामुळे समाजही त्याकडे चांगल्या दृष्टीने पहात नाही; मात्र विदेशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून फाटक्या जीन्स घालण्याची ‘फॅशन’ निघालेली आहे. भारतातही त्याचे चलन होत आहे. अनेक नट आणि नट्या त्या घालतांना दिसतात. त्यामुळे अनेक उच्चभ्रू तरुण आणि तरुणी अशा प्रकारच्या जीन्स घालून समाजात वावरतांना दिसत असतात. मध्यमवर्गीय तरुण-तरुणींमध्ये अशा प्रकारची फॅशन पुष्कळ अल्प प्रमाणात दिसून येते; कारण त्यांच्यामध्ये अद्यापतरी संस्कार कायम आहे, असे म्हणायला हरकत नसावी. ‘संस्कार हे आपल्या कृतीतून, खाण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून जसे दिसतात, तसे ते कपड्यांवरूनही दिसतात’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. भारतात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर भारतियांच्या अनेक गोष्टींत पालट झाला, त्यात कपड्यांच्या वापरातही पालट झाला. धोतराच्या जागी पॅन्ट, तर सदर्याच्या जागी शर्ट आले. पूर्वीच्या काळी धोतर घालणे हे पुरुषांचे, तर साडी नेसणे हे महिलांचे प्रमुख वस्त्र होते. अशा पोषाखामुळे चांगले संस्कार होतात हे खरे असले, तरी धोतर, सदरा घालून अनैतिक गोष्टी करणार्यांची संख्या या देशात अल्प नाही, हेही तितकेच खरे. अनेक राजकीय नेते सदरा, पायजमा घालतात; मात्र त्यांतील अनेक जण गुंड प्रवृत्तीचे, भ्रष्टाचारी असल्याचे जनतेला दिसतेे. त्यामुळे ‘केवळ कपड्यांवरूनच कुणावर चांगले संस्कार होतात’, असे म्हणणेही सर्वार्थाने समर्थनीय ठरू शकणार नाही.
उत्तराखंडमधील भाजप सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी मात्र वेशभूषा आणि संस्कार यांची सांगड घालत एक प्रसंग सांगितला. त्यात एक महिला फाटकी जीन्स घालून विमानातून प्रवास करत होती. ती एका स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती होती. यावरून मत व्यक्त करतांना रावत यांनी म्हटले, ‘अशा प्रकारचे कपडे घालणारे अन्य लोकांवर काय संस्कार करत असतील ?’ तीरथसिंह रावत यांना या प्रसंगातून जे वाटले, त्यांनी जे चिंतन केले, ते त्यांनी प्रामाणिकपणे मांडले. रावत हे संघाचे अनेक वर्षे प्रचारक राहिलेले आहेत. त्यांनी स्वयंसेवकांवर अनेक संस्कार केले असणार यात वाद नाही. ‘त्यांच्यातील स्वयंसेवकानेच हे विधान केले’, असेच म्हणावे लागेल अन्यथा आजच्या काळात पक्के राजकारणी कधीही लोकांनी ‘काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत; कारण ते स्वतः काही योग्य करत नसल्याने त्यांना हे ठाऊक असते की, आपण दुसर्यांना अशा प्रकारचा उपदेश करू नये. एवढे ते तारतम्य बाळगत असतात, तसेच अशी विधाने केल्यावर तथाकथित आधुनिकतावादी, पुरो(अधो)गामी टीका करण्यास टपलेलेच असतात. अभिव्यक्तीस्वातंत्र्य नावाचे शस्त्र परजत ते अशांवर पूर्ण शक्तीने तुटून पडतात, हे नेहमीच दिसून येत असते. त्यामुळेच रावत यांच्या विधानानंतर विविध राजकीय पक्षांच्या महिला नेत्या, अभिनेत्री, मॉडेल आदींनी रावत यांच्यावर टीकेची झोड उठवली; मात्र रावत यांच्यावर त्याचा काही काळ परिणाम झाला नाही आणि ते त्यांच्या विधानावर ठाम राहिले; मात्र नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांना जे वाटले, ते त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात लोकांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ‘रावत यांच्यावर दबाव आल्यामुळे त्यांना शेवटी असे स्पष्टीकरण द्यावे लागले असणार’, असे म्हणता येईल. आज या देशात ‘व्हॅलेंटाईन डे’ला आता कोणताही राजकीय पक्ष विरोध करतांना दिसत नाही; कारण आज तो साजरा करणे हे भारतातील तरुण पिढीचे ‘कर्तव्य’ झाले आहे. अशा तरुणांना कोणताही राजकीय पक्ष मग तो एखादा प्रखर हिंदुत्वनिष्ठ पक्ष का असेना ‘असा डे साजरा करू नये’, असे सांगण्याचे धाडस करण्याचे टाळत आहे; कारण भारतात मतदार असणार्या तरुण पिढीची संख्या मोठी आहे. त्यांना दुखावून आता चालणार नाही. संस्कृतीचा विचार नंतर करता येईल; मात्र प्रथम सत्तेचा विचार करणे अगत्याचे आहे, असे या पक्षांना वाटत असते.
हिंदूंना धर्मशिक्षण हवे !
रावत यांच्या विधानावर आक्षेप घेणार्यांनी म्हटले होते, ‘कपड्यांवरून कुणावर काय संस्कार आहेत, हे तुम्ही कसे ठरवणार ?’ रावत हे पूर्वी संघात कार्यरत असल्याने टीका करणार्या टोळींनी त्यांना संघाच्या पूर्वीच्या गणवेशावरून म्हणजे हाफ पँटवरून टीका केली. ‘फाटकी जीन्स चालत नाही, तर हाफ पँट जी लहान स्वयंसेवकांपासून ते वयस्कर स्वयंसेवकांपर्यंत कशी चालते ?’, असा प्रश्न उपस्थित केला. ‘कपड्यांवरून संस्कार कसे ठरणार ?’, असा प्रश्न एकाअर्थी योग्य असला, तरी योग्य संस्कार असेल, तर व्यक्ती असे कपडे घालणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. केवळ फॅशन म्हणून अशी जीन्स घालणे म्हटले, तर आज अर्धनग्न वावरणेही फॅशन झाली आहे आणि त्याचीही पाठराखण समाजातून केली जाते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुसरीकडे बुरख्यावरही टीका होते. याचा अर्थ जसे बुरखा घालणे अयोग्य आहे, तर अर्धनग्न रहाणे किंवा फाटकी जीन्स घालणे अयोग्य म्हणावे लागेल. ज्या पाश्चात्त्य देशांतून याचा उगम झाला, तेथे संस्कृती नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्यांना अशा कपड्यांचे कधीही वावगे वाटणार नाही; मात्र भारताला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी काय घातले पाहिजे आणि त्यातही विशेषतः महिलांनी असे कपडे घालणे हे चुकीचेच आहे, यात दुमत नाही. ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतीय संस्कारही नाहीत. रावत यांनी जे काही म्हटले, ते कदापि चुकीचे ठरणार नाही. भारतियांना त्यांची संस्कृती, परंपरा, त्यांचे महत्त्व आदींचे कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण मिळत नसल्याने त्यामागील लाभही त्यांना ठाऊक नाही. समाजामध्ये जे काही घडत आहे, त्याचे अंधानुकरण करण्याचा प्रघात सध्या पडलेला आहे. त्यातूनच अशा कृती केल्या जातात. तरीही भारतात अद्याप काही प्रकरणात संस्कृतीचे पालन होत असल्याने याला पुष्कळ मोठा प्रतिसाद मिळत नाही, हेही तितकेच खरे. तरीही हिंदु समाजाला धर्मशिक्षण देऊन भारतीय संस्कृती, आचारधर्म यांचे पालन करण्यास सांगता येईल. हिंदु राष्ट्रात हे साध्य होईल.