(म्हणे) ‘गृहमंत्र्यांच्या त्यागपत्राचा प्रश्नच नाही !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री
पंढरपूर – गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगले काम करत आहेत. त्यांना पालटण्याचा आणि त्यांच्या त्यागपत्राचा प्रश्नच नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. (गृहमंत्र्यांवर एका पोलीस अधिकार्याने एवढे आरोप करून आणि त्याविषयी ठाम भूमिका घेऊनही गृहमंत्र्यांवर कोणती कारवाई होणार नसेल, तर जनतेने कुणाकडे पहावे ? – संपादक)
जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे कुणालातरी खूष करण्यासाठी आहेत. त्या आरोपांनंतर विरोधक करत असलेल्या सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद आहे. सचिन वाझे प्रकरणाचा शिवसेेनेसमवेत संबंध जोडणे योग्य नाही; कारण जेव्हा एखादी व्यक्ती पुन्हा सरकारी सेवेत येते, तेव्हा ती सरकारी कर्मचारी असते. वाझे सेवेत परत आल्यानंतर त्यांना महत्त्वाचे दायित्व कुणी दिले, तसेच अशी कामे करायला कुणी सांगितले, याचा खुलासा आता हळूहळू होईल.’’