आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

१. ईश्‍वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे

सौ. शालिनी मराठे

‘कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे २४ मार्च या दिवशी दळणवळण बंदी घोषित झाली. रोगाच्या संसर्गाच्या भीतीने लोकांचे बाहेर जाणे बंद झाले. तेव्हा ‘आता अध्यात्मप्रसार कसा होणार ? गुरुपौर्णिमा ३ मासांवर आलेली असतांना ग्रंथ-वितरण, विज्ञापने घेणे इत्यादी सर्वच सेवा बंद झाल्यावर गुरुपौर्णिमेचा प्रसार कसा होणार ?’, अशी साधकांना चिंता वाटत असतांनाच ईश्‍वराने सामाजिक माध्यमातून ‘ऑनलाईन’ प्रसाराचे एक सुंदर नवीन दालन उघडले आणि साधकांना अमर्याद प्रसाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे घरात बसूनही २४ घंटे प्रसार होऊ लागला. हे पाहून सारे साधक आनंदी झाले. सर्व संकटग्रस्त जिवांचे आत्मबळ वाढवण्यासाठी भगवंत सर्वांच्याच साहाय्याला धावून आला. ‘कोरोनाच्या आपत्काळात परिस्थिती सर्व दृष्टीने प्रतिकूल असूनही ‘सनातन धर्माचा विहंगम गतीने प्रसार होणे’, ही भगवंताची लीलाच आहे.

२. आनंदवृद्धी करणारे सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !

ऑनलाईन सत्संग

या आपत्काळात गुणवत्ता आणि परिणामकारकता यांसमवेतच सर्वांची आनंदवृद्धी करणारे सनातनचे काही उपक्रम पुढीलप्रमाणे होते.

२ अ. घरोघरी साजरी झालेली आणि अविस्मरणीय ठरलेली वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा !

२ अ १. ‘कोरोना’ महामारीमुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीमुळे ‘गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची ?’, अशी साधकांना चिंता वाटणे : ‘कोरोना’ महामारीमुळे असलेल्या दळणवळण बंदीमुळे साधकांना ‘यंदाची गुरुपौर्णिमा कशी होणार ?’, याचे अनुमान काढता येत नव्हते; पण श्रीगुरूंनी कृपा केली आणि आपत्काळातील ही गुरुपौर्णिमा साधकांच्या जीवनातील अविस्मरणीय ठरली. प्रतिवर्षी साधक गुरुगृही किंवा एखाद्या सभागृहात एकत्र येऊन गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतात; परंतु यंदा आपत्काळात (कोरोना महामारीमुळे) ते एकत्र येऊ शकत नव्हते.

२ अ २. श्री गुरुकृपेने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा साजरी होणे : ‘साधक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आणि सेवा यांसाठी एकत्र येऊ शकत नाहीत’, हे पाहून श्री गुरूंनी साधकांवर कृपा केली आणि आपत्काळातील ही गुरुपौर्णिमा साधकांच्या जीवनातील ‘अविस्मरणीय गुरुपौर्णिमा’ ठरली ! साधकांची अडचण ओळखून ‘करुणासागर गुरुमाऊलीच जणू साधकांना त्यांच्या घरी भेटायला आली’, असे अनुभवून साधक भावविभोर झाले. या वेळी घरोघरी (‘ऑनलाईन’) ७ जुलै २०२० या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी झाली. दळणवळण बंदीमुळे अशक्य ते शक्य झाले. कुटुंबातील सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी होता आले. सर्वांना (ध्वनीचित्र-चकतीद्वारे) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पूर्वी केलेले प्रत्यक्ष मार्गदर्शन ऐकायला आणि पहायलाही मिळाले.

२ अ ३.‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा म्हणजे दुष्काळग्रस्त उपाशी माणसाला गुरुदेवांनी दिलेला पंचपक्वान्नांचा प्रसादच असणे : सनातनच्या त्रिगुरूंंचे पूजन, साक्षात् लक्ष्मीमातेची (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची) भावावस्था, परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच समष्टी राधेची (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची) समर्पित भक्ती, हे सर्व पाहून ‘ही गुरुपौर्णिमा विष्णुलोकातच साजरी होत आहे. त्यासाठी ऋषिमुनी, देवता, गंधर्व-अप्सरा, योगी-तपस्वी सारे सूक्ष्मातून उपस्थित आहेत आणि ते पुष्पवृष्टी करत आहेत’, असे अनेकांनी अनुभवले. ही ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा म्हणजे दुष्काळग्रस्त उपाशी माणसाला गुरुदेवांनी दिलेला पंचपक्वान्नांचा प्रसादच होता. प.पू. डॉक्टर, तुम्ही सर्वांना तृप्त केलेत. त्यासाठी तुमच्या चरणी अनंत कृतज्ञता !

ऑनलाईन बालसंस्कारवर्ग

२ आ. बालसंस्कारवर्ग : सनातनचे ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग देश-विदेशांतील सर्व बालकांपर्यंत पोेचले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळेत जाता येत नसल्यामुळे मुले घरीच होती. गुरुदेवांनी बालसंस्कारवर्गांच्या माध्यमातून मुलांवर सुसंस्कार करायची संधी साधकांना उपलब्ध करून दिली. काही पालकांनी या संधीचा पुरेपूर लाभ करून घेत मुलांना बालसंस्कारवर्गाशी जोडले. त्यात त्यांची आत्मोन्नतीही झाली. मुलांना याचा फार लाभ झाला. त्यांच्यात काही प्रमाणात देवामुळेच परिवर्तन दिसू लागले. काही मुलांचे ‘उद्धट बोलणे आणि वडिलधार्‍यांना उलट उत्तरे देणे’, हे स्वभावदोष न्यून झाले. ‘काही मुले आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवू लागली, तर काही मुलांना स्वतःकडून चूक झाल्यावर त्याची जाणीव होऊन ती क्षमा मागू लागली. काहींची मुले मुद्रा करून श्रीगणेशाचा नामजप करू लागली’, असे काही पालकांनी सांगितले.

२ इ. नामसत्संग-शृंखला : ‘यू ट्यूब, वर लोक उपलब्ध वेळेनुसार सत्संग शृंखला पाहू शकत होते. (यामध्ये प्रतिदिन नामसत्संग, भावसत्संग, धर्मसत्संग आणि बालसंस्कार असे चालू होते.) सद्गुरूंच्या चैतन्यवाणीतून होत असलेल्या या सत्संगांची परिणामकता जिज्ञासूंच्या अंतर्यामी पोचून विश्‍वव्यापी प्रसार झाला. लोकांना संकटाच्या वेळी नामजप मिळाले. त्यामुळे त्यांना त्याचे मोल कळले. भुकेलेल्या माणसाला अन्नाचे आणि तहानलेल्या माणसाला पाण्याचे महत्त्व सांगावे लागत नाही. त्याप्रमाणे या कालावधीत (अध्यात्माचा) प्रसार करावा लागला नाही, तर तो आपोआप आणि सहजतेने झाला.

२ ई. भक्तीमार्गातील अक्षर वाङ्मय असलेले ‘भाववृद्धी सत्संग’ !

‘अध्यात्मात शब्दजन्य ज्ञानाला २ टक्के, तर कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे’, हे शास्त्र सांगून, त्यानुसार कृती करवून घेणारी आणि साधक घडवणारी, सनातन संस्था ही एकमेव अशी ‘विश्‍वव्यापी प्रयोग शाळा’ आहे. नारदीय भक्तीसूत्रे, व्यास महर्षींचे श्रीमत् भागवत यांच्याप्रमाणेच ‘सनातनचा साप्ताहिक भाववृद्धीसत्संग, हे भक्तीमार्गातील अक्षर वाङ्मय आहे.’

२ ई १. उत्कट भावातून शब्दजन्य ज्ञान देणे : भाववृद्धी सत्संगामध्ये उत्कट भाव असलेल्या काही साधिका आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखातून जणू साक्षात् वाक्देवी सरस्वतीच प्रकटते. ‘गोपींची मधुराभक्ती, भक्त प्रल्हादाची अनन्यभक्ती, संत जनाबाईंची मायेतील परब्रह्माशी एकरूपता साधणारी भक्ती, रामायणातील सीतामातेची सर्वस्वाचा त्याग करून केलेली अपूर्वभक्ती’, या विषयांतून ‘परम भक्ती कशी असते ?’, यांचे दर्शन त्यांनी आपल्या मधुर वाणीतून सर्वांना घडवले. त्यांनी या सत्संगात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, वेळेचा सदुपयोग, कुटुंबभावना, साधना आणि प्रायश्‍चित्त यांचे महत्त्व, क्षमायाचनेचे लाभ’ आदी साधनेसाठी महत्त्वाचे अन् उपयुक्त विषय घेतले.

२ ई २. भाववृद्धी सत्संगामध्ये ईश्‍वराचा परमभक्त होऊन ‘श्री गुरूंचे प्रिय साधकफूल’ होण्याचे ध्येय देऊन कृती करण्यास प्रवृत्त करणे : गोपीभाव असणार्‍या साधिकांनी ईश्‍वराचा परमभक्त होण्यासाठी साधकांपुढे ‘आपत्काळ हा ‘कृतज्ञता काळ’ असून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून सर्वांना श्री गुरूंचे प्रिय ‘साधकफूल’ बनायचे आहे आणि सतत भावावस्थेत राहून गुरुचरणी समर्पित व्हायचे आहे’, हे अत्युच्च ध्येय ठेवले. प्रार्थना, कृतज्ञता, भावार्चना, क्षमायाचना इत्यादी कृती करायला लावून चराचरातील ईश्‍वराला अनुभवायला शिकवले. त्यांनी प्रत्येक सत्संगात साधकांना एक सूत्र देऊन आठवडाभर त्यावर प्रयत्न करण्यास सांगून प्रत्यक्ष कृतीप्रवण केले.

२ ई ३. साधनेचा आढावा घेणे : त्यांनी अशी कृती करतांना साधकांना आलेल्या अडचणी, त्यांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती सत्संगात सांगायला लावून सर्वांच्या साधनेचा आढावाही घेतला. त्यांनी साधकांना ग्रंथातील तत्त्वे प्रत्यक्ष जगायला शिकवले!’

(क्रमशः पुढच्या मंगळवारी)

– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०२०)


पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  https://sanatanprabhat.org/marathi/463895.html