अमली पदार्थ प्रकरणी गेल्या २ मासांत १८ गुन्ह्यांची नोंद, तर १८ जणांना घेतले कह्यात
अमली पदार्थांनी पोखरलेला गोवा !
पणजी, २१ मार्च (वार्ता.) – राज्यात अमली पदार्थविरोधी पथक आणि इतर पोलीस ठाणी यांनी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अमली पदार्थ तस्करी आणि सेवन या प्रकरणी एकूण १८ गुन्हे प्रविष्ट केले, तर एकूण १८ जणांना कह्यात घेतले आहे. या सर्व प्रकरणी संशयितांकडून एकूण २२ लाख ७८ सहस्र रुपये किमतीचे एकूण सुमारे १६ किलो ४८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. याच कालावधीत गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये एकूण ४१ गुन्हे प्रविष्ट झाले होते, तर ४४ जणांना कह्यात घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून अनुमाने २ कोटी १० लाख रुपये किमतीचे अनुमाने २१ किलो अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
२ वर्षांतील जानेवारी आणि फेब्रुवारी या २ मासांची तुलना केली असता किमतीत अनुमाने ८९ टक्के, तर कारवाईत ५६ टक्के घट झालेली आहे. यंदा सर्वाधिक म्हणजे ४ गुन्हे कळंगुट पोलिसांनी प्रविष्ट केले आहेत.
याचसमवेत अमली पदार्थ तस्करी आणि सेवन प्रकरणी मुंबई येथील अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एन्.सी.बी.) राज्यात कारवाईचे सत्र आरंभून अनेकांना कह्यात घेऊन मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतले होते.