फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २१.३.२०२१ ते २७.३.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, फाल्गुन मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. भानुसप्तमी : ‘भानु’ हे सूर्यदेवाचे एक नाव आहे. रविवारी सप्तमी तिथी असल्यास त्या तिथीला ‘भानुसप्तमी’ असे म्हणतात. २१.३.२०२१ या दिवशी, म्हणजेच रविवारी सकाळी ७.११ पर्यंत सप्तमी तिथी होती. या दिवशी सूर्योदयसमयी श्री सूर्यनारायणाला मनोभावे नमस्कार करून अर्घ्य द्यावे.
श्री गायत्री मंत्र म्हणून ‘निरोगी जीवन आणि तेजतत्त्व प्राप्त व्हावे’, यासाठी प्रार्थना करावी, तसेच ‘आदित्यहृदय स्तोत्रा’चे वाचन करावे.
२ आ. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. २२.३.२०२१ या दिवशी सकाळी ९.०१ पर्यंत दुर्गाष्टमी आहे. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. दुर्गासप्तशती स्तोत्र, देवीकवच, अर्गला स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात.
२ इ. आमलकी एकादशी : फाल्गुन शुक्ल पक्ष एकादशीला ‘आमलकी एकादशी’ म्हणतात. २५.३.२०२१ या दिवशी आमलकी एकादशी आहे. आमलकी एकादशी पुष्य नक्षत्रात असल्याने साधनेत प्रगती करणार्यांसाठी हे एकादशी व्रत विशेष लाभदायक असून ते केल्याने मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीला भगवान श्रीविष्णूची आवळ्याच्या झाडाखाली पूजा केली जाते.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २५.३.२०२१ या दिवशी सकाळी ९.४८ पासून रात्री १०.४९ पर्यंत आणि २६.३.२०२१ या दिवशी रात्री ९.३९ पासून २७.३.२०२१ या दिवशी पहाटे ६.१२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ उ. शुक्र किंवा भृगु प्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शुक्रवारी येणार्या त्रयोदशी तिथीला ‘शुक्रप्रदोष’ किंवा ‘भृगुप्रदोष’ म्हणतात. २६.३.२०२१ या दिवशी शुक्रप्रदोष आहे. जीवनातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, तसेच वैवाहिक सुखासाठी ‘भृगुप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच, शिवमहिम्न स्तोत्र वाचावे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.३.२०२१)
टीप १ – शुक्र पूर्व लोप (अस्त), अमृत योग, दग्ध योग, भद्रा (विष्टी करण), एकादशी, घबाड मुहूर्त, यमघंट, प्रदोष, गुरुपुष्यामृत योग आणि कल्पादि यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.
१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ
अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.
२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’