महामार्गांवर स्वदेशी झाडे लावा !
सध्या महामार्ग विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षांच्या भारतीय झाडांची मोठ्या प्रमाणात तोडणी करून रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. महामार्ग निर्माण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी (दुभाजकावर) आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना भारतीय नव्हे, तर विदेशी झाडे लावली जात आहेत. यामध्ये गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ या झाडांचा समावेश आहे. ही झाडे पर्यावरणास घातक असून मानवाला यापासून कोणताही लाभ होत नाही. महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी…’, अशी शिकवण संतांनी भारतियांना दिली आहे. सध्या वारेमाप वृक्षतोडीमुळे भीषण दुष्काळाचे परिणामी पर्यावरणाचे संकट मानवावर ओढावले आहे. पिंपळ, वड आणि लिंब आदी बहुउपयोगी झाडे लावणे बंद केल्यानेच आज दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पिंपळ, वड आणि लिंब यांची झाडे असायची. पिंपळाचे झाड १०० टक्के, वडाचे झाड ८० टक्के, तर लिंबाचे झाड ७५ टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, हे शास्त्राने सिद्ध झाले आहे; परंतु निविदा (टेंडर) संस्कृती जोपासण्यासाठी, स्वत:च खिसे भरण्यासाठी आणि लोकांना तात्पुरते ‘खूश’ ठेवण्यासाठी या झाडांना लावणे टाळले जाऊ लागले आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली पिंपळ, वड, लिंब आदी झाडांची तोडणी करून त्या ठिकाणी यूकेलिप्टस प्रकारातील वर उल्लेखलेली झाडे जात आहेत. यूकेलिप्टस प्रकारातील ही झाडे दलदलीच्या ठिकाणी लावली जातात. ही झाडे लवकर वाढतात आणि भूमीतील पाणी शोषून घेऊन भूमी कोरडी करतात. ज्यामुळे भूमी जलविहीन होते. गत अनुमाने ४० वर्षे या प्रकारातील झाडे देशातील जवळपास सर्वच महामार्गांवर लावली गेली आहेत. त्यामुळे महामार्गावरही नैसर्गिक ताजेतवाने न वाटता उष्णता वाढून पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होऊ लागले आहे.
पिंपळाला ‘वृक्षांचा राजा’ म्हटले जाते. पिंपळ वृक्षाच्या स्तुतीमध्ये ‘ज्या वृक्षाचे मूळ ब्रह्मदेव, त्वचा श्रीविष्णू आणि शाखा भगवान शिव आहेत. ज्या वृक्षांच्या पाना-पानांत देवतांचा वास आहे, अशा वृक्ष राजास नमस्कार असो !’, असे म्हटले आहे. आताही पर्यावरणाची आवश्यकता लक्षात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठराविक अंतरावर पिंपळ, वड, लिंब या प्रकारची झाडे लावल्यास देश काही वर्षांतच प्रदूषणमुक्त होईल.
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा