मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आशीर्वादानेच निलंबन रहित करून सचिन वाझे यांना महत्त्वाच्या पदावर घेतले ! – देवेंद्र फडणवीस
मुंबई – एखाद्या निलंबित व्यक्तीला काही कारणास्तव पुन्हा सेवेत घेतले, तर तिला महत्त्वाचे अधिकारीपद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही ? एवढेच नाही, तर सगळ्या महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडेच देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाविना झाले का ? परमवीर सिंह यांच्या समितीने वाझे यांचे निलंबन रहित करून त्यांना पदावर घेतले, हे शरद पवार म्हणतात ते अर्धसत्य आहे; पण त्यांचे पुढचे वाक्य ते विसरले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आशीर्वादाने हे काम परमवीर सिंह यांनी केले, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २१ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला. त्यासाठीच सचिन वाझे साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाची व्यक्ती इतक्या महत्त्वाच्या पदावर गेली, असेही फडणवीस यांनी या वेळी म्हटले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘शरद पवार हे सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकार कसेही वागले, तरी निर्मात्यांना आपले सरकार वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. परमवीर सिंह यांनी वाझे यांना परत घेतले; मात्र त्यांना महत्त्वाची जागा दिली तेव्हा सरकार झोपले होते का ? परमवीर सिंह यांचे स्थानांतर झाल्यावर ते आरोप करत असल्याचे शरद पवार म्हणत आहेत; पण सुबोध जैस्वाल आणि रश्मी शुक्ला यांचे तर स्थानांतर झाले नव्हते. त्यांनी पुराव्याच्या आधारावर सरकारकडे अहवाल सादर केला होता. त्याच वेळी कारवाई झाली असती, तर आज ही वेळ आली नसती.’’
स्थानांतरातील दलालीचा संपूर्ण अहवाल मिळूनही गृहमंत्र्यांनी कारवाई केली नाही !
पोलिसांच्या स्थानांतरामागील दलालीविषयी संपूर्ण अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी सादर केला होता. त्या वेळच्या कमिशनर इंटलिजन्सच्या माध्यमातून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यानंतर तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला होता; मात्र त्यावर पुढची कुठलीही कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोपही या वेळी फडणवीस यांनी वेळी केला. (असे असेल, तर याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा नायनाट करावा ! – संपादक)