अनधिकृत टपर्या हटवा, अन्यथा ५०० टपर्या उभारण्यासाठी अनुमती द्या ! – शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सातारा, २१ मार्च (वार्ता.) – शहरातील मुख्य रस्ते आणि चौक यांमध्ये अनधिकृतपणे टपर्या टाकून व्यवसाय केला जात आहे. प्रशासन १५ दिवसांत अनधिकृत टपर्या हटवणार नसेल, तर शहरातील विविध भागात ५०० टपर्याण्यासाठी अनुमती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकाचौकांत अनधिकृत टपरीधारक वाढत आहेत. यामुळे नागरिकांना पदपथावरून, रस्त्यावरून आणि चौकातून व्यवस्थित चालताही येत नाही. याविषयी प्रशासनाकडे अनेकवेळा तोंडी आणि लेखी पत्रव्यवहार केला आहे; मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
२. ज्या टपरीधारक व्यावसायिकांची सातारा नगरपालिकेकडे अधिकृत नोंद आहे, त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर रात्री १० वाजेपर्यंत मंडई बसलेली असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा संबंधित सर्व भाजीविक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे नोंद झाले पाहिजेत.
३. अतिक्रमणासमवेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यासाठी पालिकेची कोणतीही अनुमती घेतली जात नाही. बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच इतस्त: पडलेले असते. कामात हयगय करणार्या भागनिरीक्षकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.