पाचगणी (जिल्हा सातारा) प्राधिकरण कार्यालयात अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात हाणामारी
प्राधिकरण कार्यालयातील भोंगळ कारभार ! अशा घटनांमधून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात असलेला समन्वयाचा अभावही दिसून येतो !
सातारा, २१ मार्च (वार्ता.) – पाण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होत असतांना पाचगणी (जिल्हा सातारा) येथील प्राधिकरण कार्यालयात मात्र अधिकार्यांमध्ये हाणामारी झाली.
गत ४ दिवसांपासून पाचगणी शहरातील एका भागात पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांनी प्राधिकरण कार्यालय गाठले; मात्र समस्येवर उपाय न काढता वरिष्ठ अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले. कार्यालयातील खुर्च्या एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आल्या.
प्राधिकरणाचे अवाजवी ‘मीटर रिडिंग’, भरमसाठ पाणी देयके, खंडित पाणीपुरवठा या सगळ्याला नागरिक वैतागले आहेत. या सर्व गोष्टींमुळे ‘प्राधिकरण एकप्रकारे नागरिकांना वेठीस धरत आहे’, असे नागरिकांना वाटते. त्यामुळे ‘कर्तव्यात चालढकलपणा करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्थानांतर करून चांगले आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी प्राधिकरणावर पाठवावेत’, अशी मागणी पाचगणी येथील नागरिक करत आहेत.