अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ मास्लो यांचा ‘मानवाच्या गरजेचा प्राधान्यक्रम आणि स्वयंप्रेरणा’ याविषयीचा सिद्धांत अन् कलियुगातील मानवाच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचे तुलनात्मक विश्लेषण !
|
१. मानवाला व्यावहारिक जीवन जगत असतांना मास्लोचा सिद्धांत उपयुक्त ठरणे
मनुष्याला जिवंत रहाणे आणि जीवन जगणे यांसाठी प्रेरणा पाहिजे असते. त्याला जगण्यासाठी ५ गोष्टींची आवश्यकता असते. (सूत्र ३ पहा.) प्राधान्याने एक आवश्यकता पूर्ण झाली की, तो दुसरी आवश्यकता भागवण्यासाठी धडपडत असतो. मनुष्य प्राधान्यक्रमाने पुढील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी (सूत्र ३ पहा.) जीवनभर धडपडत असतो. त्याला ‘मास्लोचा पिरॅमिड’ असेही म्हणतात. मास्लोचा सिद्धांत मानसशास्त्राच्या दृष्टीने फार प्रसिद्ध आणि उपयोगाचा मानला गेला आहे.
२. ऋषिमुनी आणि संत यांनी मनुष्याला ‘आनंदप्राप्ती कशी प्राप्त करायची ?’, याविषयी प्राचीन काळापासून मार्गदर्शन केले असणे
भारतामधील ऋषिमुनी आणि संत यांनी मानवाला मानसिक स्तराच्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरचे ध्येय, म्हणजे ‘मोक्षप्राप्ती’ आहे आणि ‘ते कसे प्राप्त करायचे ?’, याविषयी प्राचीन काळापासून जगाला मार्गदर्शन केले आहे.
सध्याच्या कलियुगांतर्गत कलियुगामध्ये मानवाच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. (Gurukrupayog is integration of the psychology and spirituality for the cause of Human being.)
३. मास्लोचे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म, म्हणजेच ‘गुरुकृपायोग’ यांचा तुलनात्मक अभ्यास
मास्लोचे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म, म्हणजेच ‘गुरुकृपायोग’ यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पुढील सूत्रे शिकायला मिळाली. मास्लोने सांगितलेल्या प्रत्येक टप्प्याला ‘गुरुकृपायोगानुसार, म्हणजे आध्यात्मिक स्तरावर कोणती प्रक्रिया होते ?’, हे येथे दिले आहे.
३ अ. मास्लोच्या सिद्धांतानुसार पहिला टप्पा : नैसर्गिक आवश्यकता, उदा. अन्न, वस्त्र, निवारा आणि झोप
३ अ १. अध्यात्मानुसार पहिला टप्पा : या टप्प्याच्या नैसर्गिक आवश्यकता पुरवतांना माणसामध्ये ‘काळजी करणे, आळशीपणा, अल्पसंतुष्टता इत्यादी स्वभावदोष असतील, तर त्याच्या मनाचा संघर्ष होतो. गुरुकृपायोगानुसार साधना करून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले, तर त्या साधकाला परिस्थिती स्वीकारून आनंदी जीवन जगता येते. ‘गरिबी किंवा श्रीमंती हे सर्व आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे’, असा आध्यात्मिक दृष्टीकोन घेऊन तो असेल ती परिस्थिती स्वीकारून समाधानाने रहातो. ‘साधनेचे ३० टक्के क्रियमाण वापरून साधक ७० टक्के प्रारब्धावर मात करू शकतो’, अशी शिकवणही गुरुदेवांनी दिली आहे. अशा रितीने साधकाने योग्य साधना केल्याने त्याच्या नैसर्गिक आवश्यकता पूर्ण होतात आणि तो ईश्वरेच्छेने आनंदाने जीवन कंठू शकतो.
३ आ. मास्लोच्या सिद्धांतानुसार दुसरा टप्पा : सुरक्षेची आवश्यकता, उदा. वैयक्तिक सुरक्षा, नोकरी, उत्पन्न आणि आरोग्य
३ आ १. अध्यात्मानुसार दुसरा टप्पा : या टप्प्याच्या सुरक्षेच्या आवश्यकता पुरवतांना माणसामध्ये ‘न्यूनगंड असणे, असुरक्षिततेची भावना असणे, भीती वाटणे’ इत्यादी स्वभावदोष असतील, तर त्याच्या मनाचा संघर्ष होतो. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास स्वभावदोष आणि अहं यांचे निश्चितपणे निर्मूलन होऊ शकते. त्यासाठी स्वयंसूचना घेऊ शकतो. विष्णुभक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी, म्हणजे दैत्य हिरण्यकश्यपूने मारण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रल्हादाऐवजी विष्णूच्या नृसिंह अवताराने हिरण्यकश्यपूला मारले. ‘देव तारी त्याला कोण मारी ?’, या म्हणीचा प्रत्यय सनातन संस्थेतील बर्याच साधकांना येत आहेे.
३ इ. मास्लोच्या सिद्धांतानुसार तिसरा टप्पा : सामाजिक आवश्यकता, उदा. मैत्री, कुटुंब, आत्मीयता आणि जवळीक
३ इ १. अध्यात्मानुसार तिसरा टप्पा : या टप्प्याच्या आवश्यकता पुरवतांना माणसामध्ये ‘द्वेष करणे, सूडबुद्धी, भावनाप्रधानता (वस्तू किंवा वास्तू यांच्या संदर्भात) असणे, भावनाशीलता (व्यक्तींच्या संदर्भात), इतरांचा विचार न करणे’ इत्यादी स्वभावदोष असतील, तर त्याच्या मनाचा संघर्ष होतो. त्याचे जीवन दुःखमय होते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास स्वभावदोष निर्मूलन होऊन ‘निरपेक्ष पे्रेम, कर्तव्यदक्षता, आत्मीयता, इतरांचा विचार करणे’, हे गुण अंगी बाणवता येतात. परिणामी त्याच्या सामाजिक आवश्यकता पूर्ण होऊन तो आनंदी जीवन जगू शकतो.
३ ई. मास्लोच्या सिद्धांतानुसार चौथा टप्पा : स्वाभिमान, मानापमान, प्रतिष्ठा, आदर, स्वातंत्र्य, लोकांनी प्रशंसा करणे यांची आवश्यकता
३ ई १. अध्यात्मानुसार चौथा टप्पा : या टप्प्याच्या आवश्यकता पुरवतांना माणसामध्ये ‘उद्धटपणा, वर्चस्व गाजवणे, निराशावादी वृत्ती, हेवा वाटणे, दुसर्यांना तुच्छ लेखणे, ‘दुसर्यांनी आपला आदर राखावा’, अशी अपेक्षा करणे, स्वकौतुकाची अपेक्षा करणे इत्यादी स्वभावदोष असतील, तर माणसाकडे सर्व भौतिक गोष्टी उपलब्ध असूनही तो दुःखी असतो. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास स्वभावदोष आणि अहं यांचेे निर्मूलन होऊन तो या टप्प्याला सकारात्मक आणि समाधानी वृत्तीने जीवन कंठू शकतो.
३ उ. मास्लोच्या सिद्धांतानुसार पाचवा टप्पा : मी कोण आहे ? माझ्यात काय शक्ती आहे ? त्या शक्तीचा मी अधिकाधिक उपयोग कसा करू ? स्वतःची क्षमता ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करणे, स्वतःच्या आंतरिक आवश्यकता ओळखून त्यानुसार वागणे आणि स्वतःमध्ये नैतिकता अन् निर्मिती करण्याची वृत्ती बाणवणे.
३ उ १. अध्यात्मानुसार पाचवा टप्पा : या टप्प्याच्या आवश्यकता पुरवतांना माणसामध्ये ‘प्रतिमा जपणे, कर्तेपणा घेणे, अपेक्षा करणे’ इत्यादी अहंचे पैलू असल्यामुळे त्याच्या मनाचा संघर्ष होत रहातो. भौतिक, ऐहिक आणि मानसिक सुखाच्या सर्व सोयीसुविधा असतांनाही तो दुःखी जीवन जगत असतो. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास अशा सर्व अहंच्या पैलूंचे निर्मूलन होऊ शकते. त्याच्या अंगी ईश्वरी गुण येऊन त्याचे संतांसारखे कणखर व्यक्तीमत्त्व बनून तो आनंदी जीवन जगतो.
४. स्वतःचे मूल्यमापन करतांना ‘स्वतःत कोणते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू अन् गुण आहेत ?’, हे जाणून घेणे आवश्यक !
वरील तुलनेचा आधार घेऊन जीवन जगतांना आपण ‘मी मास्लोने सांगितलेल्या आणि गुरुकृपायोगानुसार साधनेच्या कोणत्या स्तरावर आहे ?’, याचा अभ्यास करू शकतो. स्वतःचे मूल्यमापन करतांना ‘स्वतःत कोणते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू अन् गुण आहेत ?’, हे जाणून घेऊ शकतो. या स्थितीला आपण इतरांकडून मार्गदर्शन घेऊ शकतो. परिस्थिती आणि वास्तव स्वीकारून आणि सकारात्मक राहून साधनेचे पुढील प्रयत्न करून आनंदाने जीवन जगू शकतो.
५. साधना करतांना मास्लोचा सिद्धांत नव्हे, तर ऋषिमुनी आणि संत यांची शिकवण आचरणात आणणे महत्त्वाचे असणे
५ अ. साधना केल्यास परिस्थिती स्वीकारता येऊन सकारात्मक आणि आनंदी रहाता येणे : मास्लोचा सिद्धांत व्यवहारासाठी उपयोगी आहे; मात्र साधना करतांना आपल्याला मानसिक स्तराच्या पुढे आध्यात्मिक स्तरावर जायचे असते. वरील सूत्राचा अभ्यास केल्यावर सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारली, तर परिस्थितीतच देव भेटतो. देवाने परिस्थिती निर्माण केलेली असल्यामुळे ती स्वीकारून सकारात्मक आणि आनंदी रहाणे, हीच साधना आहे. ते साध्य करण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचा अवलंब करू शकतो. परिणामी व्यक्ती मास्लोच्या सिद्धांतानुसार कोणत्याही टप्प्याला असली, तरी संत तुकाराम महाराज यांच्या पुढील अभंगात सांगितल्याप्रमाणे समाधानी आणि जीवन कंठू शकते.
हेचि थोर भक्ति आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची ॥ १ ॥
ठेविले अनंते तैसेचि रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ॥ २ ॥
वाहिल्या उद्वेग दुखःची केवळ ।
भोगणे ते मूळ संचिताचे ॥ ३ ॥
तुका म्हणे घालू तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापाशी ॥ ४ ॥
५ आ. आनंदी रहाण्यासाठी ऋषिमुनींनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असणे : केवळ मानसशास्त्राचा अभ्यास करण्याऐवजी आनंदी रहाण्यासाठी आपल्या ऋषिमुनींनी लिहून ठेवलेले वेद, उपनिषदे, रामायण, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्गवद्गीता, असे अनेक धर्मग्रंथ आणि संतांची शिकवण यांतून मार्गदर्शन घेऊ शकतो.
५ इ. गुरुकृपायोगानुसार अष्टांगसाधना केल्याने अनेक साधकांची आध्यात्मिक प्रगती होत असणे : सध्याच्या कलियुगासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा एक श्रेष्ठ साधनामार्ग सांगितला आहे. त्यामध्ये ‘स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती’, हे महत्त्वाचे घटक आहेत. (गुरुकृपायोगानुसार साधना करून ३१.१०.२०२० पर्यंत १०८ साधक संत झाले, तर १ सहस्र १०६ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.)
५ ई. ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासाचे निवारण कसे करायचे ?’, याविषयी मोलाचे मार्गदर्शन गुरुकृपायोगात केलेले असणे : ‘पूर्वी धर्मकार्यात आणि यज्ञयागामध्ये राक्षस अन् अनिष्ट शक्ती बाधा आणत असत’, असा संदर्भ रामायणामध्ये आहे. त्याचप्रमाणे सध्या व्यक्ती साधना करायला लागल्यावर तिला रज-तमात्मक वातावरणाचा आणि अनिष्ट शक्तींचा त्रास होतो. ‘त्याचे निवारण कसे करायचे ?’, याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन गुरुकृपायोगात दिले आहे.
६. सध्या महाविद्यालये आणि आस्थापने यांमध्ये आयोजित करण्यात येणार्या कार्यशाळांत साधना शिकवल्यास एक निरोगी, आनंदी अन् समृद्ध समाज (हिंदु राष्ट्र) निर्माण होईल !
सध्या महाविद्यालये आणि आस्थापने यांमध्ये आयोजित करण्यात येणार्या कार्यशाळांत व्यक्तीमत्त्व विकास, मानसशास्त्र आणि व्यवस्थापनाच्या तांत्रिक विषयावरील अनेक सिद्धांत शिकवले जातात. त्याचा व्यावहारिक दृष्टीने आस्थापन आणि कामगार यांना लाभ होतो; मात्र हिंदूंंचे धर्मग्रंथ, संतांची शिकवण आणि गुरुकृपायोग यांविषयी शिकवले, तर सर्व प्राणीमात्रांना व्यवहाराच्या समवेत त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल. त्यामुळे ‘सध्याचे रज-तमयुक्त, ताण-तणावाचे आणि आपत्कालीन समाजजीवन जाऊन एक निरोगी, आनंदी आणि समृद्ध समाज निर्माण होईल’, असे वाटते. अशा समाजव्यवस्थेला ‘ईश्वरी राज्य’ किंवा ‘हिंदु राष्ट्र’ म्हणतात.
७. ‘मास्लोच्या तत्त्वज्ञानाच्या समवेत आनंदी रहाण्यासाठी मानवाला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग आंतराष्ट्रीय स्तरावर शिकवला, तर त्याचे जीवन आनंदी होऊ शकेल’, असे माझ्या अनुभवावरून वाटते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘आधुनिक व्यावसायिक आणि मानसशास्त्र’ यांचे शिक्षण अन् ‘अध्यात्मशास्त्र’ यांविषयीची सूत्रे सुचवली अन् स्फूर्ती देऊन ती लिहून घेतली’, यासाठी मी त्यांंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |