कुंभमेळ्यासाठी १२० कोटी रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या हस्ते लोकार्पण
हरिद्वार, २० मार्च (वार्ता.) – कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या १२० कोेटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी २० मार्च या दिवशी मिडिया सेंटर येथे एका कार्यक्रमामध्ये केले. या वेळी मुख्यमंत्री रावत म्हणाले की, कोरोनामुळे कुंभमेळा कसा होणार ? याविषयी गैरसमज पसरवण्यात आले. त्यामुळे भाविकांसह व्यापारीही चिंतेत होते. हे पाहून आपण कुंभमेळ्याला येण्यासाठीचे अनावश्यक नियम संपुष्टात आणले आहेत; मात्र सर्वांनी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. भाविकांना ये-जा करण्यासाठी ४ पटीने बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हरिद्वारमध्ये स्वत:चे घर बांधण्यासाठी यापूर्वी खूप अडचणी येत होत्या. याची नोंद घेऊन मंत्रीमंडळाने हरिद्वार विकास प्राधिकरण रहित केले आहे. वर्ष २०२४ पर्यंत उत्तराखंड रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार आहे.
पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्. नकारात्मक चाचणी अहवालाची अट काढली का ?’, याविषयी विचारले असता त्यांनी त्यावर थेट उत्तर न देता केवळ ‘भारत सरकारच्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे’, असे सांगत या प्रश्नाला बगल दिली. या प्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक, विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होेते.
येथील ‘हरकी पौडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून काही नाल्यांमधील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट गंगेमध्ये सोडले जाते’, याविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्री रावत यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी ‘या प्रकरणी संबंधित अधिकार्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या कामात १० दिवसांत गती दिसून येईल’, असे स्पष्ट केले. ‘तरीही तुम्हाला कुठे असा प्रकार दिसून आला असेल, तर मला सांगा. त्यावर कार्यवाही करण्यात येईल’, असेही रावत यांनी सांगितले.