विशाळगडावरील अतिक्रमणाची गडावर जाऊन पहाणी करणार ! – कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्वासन
विशाळगडावरील अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई करावी,यासाठी कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे आणि यावल येथे दिले निवेदन
कोल्हापूर – विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या संदर्भात जे निवेदन तुम्ही दिले आहे, त्या संदर्भात मी स्वत: पहाणी करतो. याविषयी पुरातत्व खात्याला पत्र लिहून स्पष्टीकरण मागवू. हे अतिक्रमण मुख्यत्वेकरून ज्या विभागाच्या अंतर्गत येते त्यावर पुरातत्व खात्याने कारवाई करणे अपेक्षित आहे. वेळप्रसंगी पुरातत्व खात्याच्या राज्य संचालकांशी बोलू. अतिक्रमण काढण्यास पुरातत्व खात्याची सिद्धता असल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवू, असे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने १९ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. बाबासाहेब भोपळे, भाजपचे श्री. सतीश पाटील आणि श्री. उत्तम पाटील उपस्थित होते.
जळगाव – पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विशाळगड आज दुरावस्थेत आहे. विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णोद्धार करावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीस अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने जळगाव, धुळे आणि यावल येथे प्रशासनास १९ मार्च या दिवशी निवेदन देण्यात आले.
शिवप्रेमींच्या या मागण्या मान्य न झाल्यास याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली. जळगाव येथील निवेदन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना, यावल येथील निवेदन नायब तहसीलदार आर्.डी. पाटील यांना, तर धुळे येथील निवेदन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांना देण्यात आले.