इयत्ता १० वी आणि १२ वी ची परीक्षा ‘ऑफलाईन’ होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
१० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार !
मुंबई – वर्ष २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाची इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत ‘ऑफलाईन’ पद्धतीने घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २० मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना वर्षा गायकवाड म्हणाल्या,
१. कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव न्यून झाला असल्यामुळे वर्षी लेखी परीक्षेचा कालावधी ३ घंट्यांऐवजी ३ घंटे ३० मिनिटे करण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा कालावधी १ घंटा वाढवण्यात आला आहे.
२. कोरोनामुळे १० वीचे परीक्षा केंद्र त्याच शाळेत किंवा तेथील कनिष्ठ महाविद्यालयात असणार आहे. जागा अपुरी पडल्यास नजीकच्या शाळेत विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात येईल.
३. १० वीची प्रात्यक्षिक परीक्षा या वर्षी २१ मे ते १० जुलै या कालावधीत प्रात्यक्षिक पद्धतीने घेण्यात येणार आहे.
४. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्यास, कुटुंबियांमध्ये कुणाला कोरोना झाला असल्यास किंवा विद्यार्थी प्रतिबंधात्मक क्षेत्रात असल्यास त्यांच्यासाठी जून मासात विशेष परीक्षा घेतली जाईल.
५. अर्धा घंटा अधिक वेळ असल्यामुळे या वर्षी परीक्षा सकाळी १०.३० वाजता चालू होईल.
६. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून या कालावधीत होणार आहे. यामध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके अल्प करण्यात आली आहेत.
७. बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंतर्गत त्यांचा गृहपाठ सादर करायचा आहे. कोरोनामुळे यामध्ये काही अडचण आल्यास त्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.