आपत्काळाच्या दृष्टीने घरातील सज्ज्यात किंवा आगाशीत भाज्या लावा !
घराच्या आगाशीत लावायच्या भाज्या
१. ‘आपत्काळात अल्प कालावधीत अधिक पीक किंवा फळे मिळणे आवश्यक असते’, हे लक्षात घेता अळू वगळता बहुतेक पालेभाज्या; गवार, कोबी, वाटाणा, ‘फ्लॉवर’, टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, भोपळी मिरची, वाल, तोंडली आदी वेलवर्गीय भाज्या; बटाटा, बीट, गाजर, मुळा, रताळी, विदारीकंद, कारांदे, कोनफळ आणि कणगी या कंदवर्गीय भाज्या.
२. सज्जात दिवसाचे ३ – ४ घंटे (तास) सूर्यप्रकाश येत असेल, तर तेथे वांगी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर इत्यादी लावू शकतो. सज्जात सूर्यप्रकाश फारसा येत नसला, तरी तेथे आले लावू शकतो.
३. बहुतेक पालेभाज्या, वांगी, टोमॅटो अन् भेंडी या भाज्या केव्हाही लावाव्यात. वेलवर्गीय (उदा. तोंडली) आणि शेंगवर्गीय (उदा. गवार) भाज्या पावसाळ्याच्या आरंभी किंवा हिवाळ्याच्या अखेरीस लावाव्यात. कंदवर्गीय भाज्या (उदा. रताळे) आणि फळझाडे पावसाळा चालू झाल्यावर लगेचच लावावीत.’
घराच्या आवारात लावायची फळझाडे
लिंबू, केळी, पेरू, चिकू, पपई, अननस, सीताफळ आणि अंजीर’
– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २०२०)
कुंड्यांव्यतिरिक्त अन्य साधनांचाही वापर करा !
‘मातीच्या कुंड्यांमध्ये झाडे लावणे’ हे झाडांच्या वाढीच्या दृष्टीने आदर्श आहे; पत्र्याची पिंपे; तेलाचे रिकामे पत्र्याचे डबे; प्लास्टिकच्या गोण्या, पिशव्या, डबे, पसरट ‘टब’ किंवा पिंपे आदी पर्यायी साधनांचा वापर करणे जास्त चांगले आहे. या साधनांना पाण्याचा निचरा होण्यासाठी तळापासून अर्धा इंच वर समान अंतरावर २-३ छिद्रे पाडावीत.
– श्री. माधव रामचंद्र पराडकर, डिचोली, गोवा. (२८.५.२०२०)