२०१५ मध्ये नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर तेथे निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती !
१. स्वयंपाकाच्या ‘गॅस’च्या तुटवड्यामुळे जनतेवर ओढवलेले कठीण प्रसंग
१ अ. ‘रु. १,५०० किंमतीच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी काळ्या बाजारात रु. ८,००० मोजावे लागत होतेे. लोकांना पुढे ७ मास ‘गॅस सिलिंडर’च मिळत नव्हते. त्यामुळे लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रतिकिलो’ एवढा महाग होता.
१ आ. ओली लाकडे लवकर पेट घेत नसल्यामुळे महिलांना चूल पेटवण्यास त्रास होई. अनेकांकडे लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड नसल्याने आणि काहींना ‘कुर्हाडीने लाकडे कशी फोडतात ?’, हे ठाऊक नसल्याने त्यांना ती लाकडे इतरांकडून फोडून घ्यावी लागत. भाड्याच्या घरांत रहाणार्या लोकांना घरमालक घरात चुलीवर स्वयंपाक करू देत नसत.
१ इ. इंधनाच्या तुटवड्यामुळे वाहने उपलब्ध नसल्याने तो सिलिंडर स्वतःच्या घरापर्यंत घेऊन जाणे कठीण होई.
२. त्या काळात किराणा दुकानांमध्ये बरेचसे सामान उपलब्ध नव्हतेे. उपलब्ध असलेले सामानही नेहमीपेक्षा चारपट मूल्याने विकत घ्यावे लागे.
३. रुग्णालयांमध्ये औषधेच उपलब्ध नसल्याने काही लोक अल्पशा विकारानेही मृत्यूमुखी पडले.
४. काठमांडू शहरात अधिकृतरित्या दिवसाचेे १४ घंटे वीजपुरवठा बंद होता. वीजपुरवठा चालू झाल्यावर घरोघरी लोक पाण्याचा ‘पंप’ चालू करणे, विजेच्या उपकरणांवर स्वयंपाक करणे इत्यादी कृती करत. त्या ‘लोड’मुळे रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) जळून जायची. अशी रोहित्रे दुरुस्त करायला शासकीय कर्मचारी ४ – ५ दिवस लावत.
५. पेट्रोल आणि डिझेल यांच्या तुटवड्यामुळे वाहने उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शाळा आणि उद्योग बंद होते. काही वेळा शासनाकडून या इंधनांचे वितरण केले जायचेे; परंतु ते मिळण्यासाठी ४ – ५ घंटे रांगेत थांबावे लागे. अनेकांचा क्रमांक येईपर्यंत इंधन संपून जात असल्यामुळे त्यांना अनेक आठवडे पुन्हा प्रतीक्षा करावी लागे. शासनाकडून ‘इंधनाचे पुढचे वितरण कधी होणार ?’, याविषयी काहीच माहिती मिळत नसे. त्यामुळे लोक अनेक दिवस आपली वाहने रस्त्यावरच रांगेत ठेवून जात. एरव्ही १०० ते १३० रुपये प्रतिलिटर असणारे पेट्रोल काळ्या बाजारात ५०० रुपये प्रतिलिटरने विकले जायचे. इंधनाच्या टंचाईमुळे सायकलचे मूल्य दुपटीहून अधिक वाढले. – सौ. सानु तामाङ्ग, नेपाळ येथील धर्मप्रेमी (२४.४.२०१६)
६. वीज, तसेच पेट्रोल अन् डिझेल यांच्या अभावी ‘इंटरनेट’ बंद असणे
विविध कार्यालयांचा वीज-पुरवठा बंद असतांना जनित्रांच्या (जनरेटरच्या) साहाय्याने वीज-पुरवठा चालू ठेवला जात असे. मात्र भूकंपानंतर विजेपाठोपाठ पेट्रोल अन् डिझेल यांचाही तुटवडा होऊन ही जनित्रे तशी निरुपयोगी झाली. परिणामी ‘इंटरनेट’द्वारे चालणारे कामकाज थांबले.
७. उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांना नोकर्या गमवाव्या लागणे
त्या काळात सुमारे २,००० उद्योगधंदे बंद पडले आणि साधारणपणे १ लाख लोकांना नोकर्या गमवाव्या लागल्या.’
– सौ. सानु तामाङ्ग, नेपाळ येथील धर्मप्रेमी (२४.४.२०१६)