वेळागर येथे होत असलेल्या ‘पॅरासिलिंग’च्या विरोधात मासेमारांचे काम बंद आंदोलन
वेंगुर्ला – तालुक्यातील वेळागर (शिरोडा) येथे चालू असलेल्या ‘पॅरासिलिंग’मुळे (एका जलक्रीडा प्रकारामुळे) मासेमारीवर परिणाम होत आहे, तसेच याच्या विरोधात आवाज उठवणार्या येथील काही मासेमारांवर ‘पॅरासिलिंग’च्या मालकाने दावे प्रविष्ट केल्याने केरवाडा येथील ६०० ते ७०० संतप्त मासेमारांनी १९ मार्चला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून वेळागर येथे आंदोलन केले. या समस्येवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून तोडगा न निघाल्यास संघर्ष करण्यात येईल, अशी चेतावणी या वेळी मासेमारांनी दिली.
वेळागर येथे चालू असलेल्या पॅरासिलिंगचे यंत्र मोठ्या शक्तीचे असल्याने समुद्रातील पाणी ढवळून निघते. त्यामुळे याचा मासेमारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, असा आरोप येथील मासेमार करत आहेत. याच्या विरोधात १ वर्षापूर्वी आवाज उठवला गेला होता. नंतर कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे बंद असलेला ‘पॅरासिलिंग’ हा जलक्रीडा प्रकार पुन्हा चालू झाल्याने मासेमारांनी पुन्हा याच्या विरोधात आवाज उठवला आहे. या वेळी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच रवि पेडणेकर, माजी उपसरपंच वासुदेव पेडणेकर यांच्यासह शेकडो मासेमार उपस्थित होते.
आंदोलनस्थळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मासेमारांचे नेते दादा केळुसकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उपाख्य बाळू परब, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांनी भेट देऊन मासेमारांशी चर्चा केली.