सातारा येथील नारायण सारंगकर यांची पोलीस निरीक्षक पदावरून १ वर्षासाठी पदावनती !
सातारा, १९ मार्च (वार्ता.) – वादग्रस्त ठरलेले शहर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे पोलीस विभागीय चौकशी अंतर्गत वेगवेगळ्या दोषारोपांपैकी ३ दोषारोपांमध्ये दोषी आढळून आले आहेत. यामुळे पोलीस महासंचालकांनी १ वर्षासाठी सारंगकर यांना पदावनतीची शिक्षा ठोठावली आहे.
वरिष्ठ पदावर कार्यरत असतांना नोंद केलेल्या गुन्ह्यांची माहिती नियंत्रण कक्ष आणि वरिष्ठ यांना न देणे, अधिकाराचा अपलाभ घेणे, कह्यात घेतलेला मुद्देमाल तातडीने शासनाधीन न करणे, त्यांनी नोंद नोंदवहीत केली आहे किंवा नाही हे न पडताळणे हे आणि इतर दोषारोप सारंगकर यांच्याविषयी सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना पदावनतीची शिक्षा देण्यात आली आहे.
पुरावा नसतांना ४ वर्षे कोठडीत राहिलेल्या व्यक्तीची हानीभरपाई तपास अधिकारी देणार का ?सत्र न्यायालय खटला क्रमांक ८१/२०१८ मध्ये सारंगकर यांनी तपास केला होता. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नसतांना त्यास ४ मासांनी अटक करण्यात आली होती. ‘आरोपीने गुन्हा केला, दुचाकीवरून पळून गेले’, असे सांगणारा कोणताही साक्षीदार पुढे आला नाही. तसेच आरोपीचे कपडे आणि पडताळणीसाठी पाठवलेले कपडे हे वेगवेगळे आहेत. अन्य ठिकाणी सापडलेले ठसे आणि आरोपीचे ठसे जुळत नाहीत. या गोष्टी न्यायालयानेही मान्य केल्या आहेत. तसेच याविषयी केलेली अटक आणि तपास चुकीचा असून निरापराध व्यक्तीवर नाहक अन्याय करणारा आहे, असे मत न्यायालयाने निकालपत्रामध्ये नोंदवले आहे. मग निरापराध व्यक्ती ४ वर्षे कोठडीत राहिली, याची हानीभरपाई तपास अधिकारी देणार का ? असा प्रश्न निरापराध व्यक्ती उपस्थित करत आहे. |