देशी बनावटीचे पिस्तूल आणि गावठी कट्टा यांची तस्करी करणार्यास अटक !
कराड, १९ मार्च (वार्ता.) – कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील रेल्वे फाटकाजवळ १६ मार्च या दिवशी गावठी कट्ट्यासह पिस्तुलाची तस्करी करणारे अभिजीत उपाख्य पप्पू लक्ष्मण मोरे यांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. मोरे यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अभिजीत उपाख्य पप्पू लक्ष्मण मोरे हे पिस्तूल घेऊन विक्रीच्या उद्देशाने वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कराड तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांना घटनास्थळी मोरे हे संशयितरित्या वावरतांना आढळून आले. पोलिसांनी मोरे यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूूल, गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. मोरे यांच्याकडून मिळालेला अनुमाने १ लाख २० सहस्र रुपयांचा मद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.