निर्मळ मनाने सहसाधिकेच्या आनंदात सहभागी होणार्या कु. अंजली क्षीरसागर !
१. संतांचे बोलणे ऐकून साधिकेला पुष्कळ आनंद होणे आणि अंजलीताईच्या तोंडवळ्यावरही पुष्कळ आनंद दिसल्याने ‘ती साधिकेला झालेल्या आनंदामुळे आनंदी झाली आहे’, हे लक्षात येणे
मी २ वर्षांपासून रामनाथी आश्रमात कलेशी संबंधित सेवा करत आहे. ‘३१.१२.२०२० या दिवशी मला प्रथमच एका संतांना एक सेवा दाखवायची संधी मिळाली. मी ही सेवा प्रथमच करत असल्याने मला पुष्कळ भीती वाटत होती. त्या वेळी माझ्या समवेत कु. अंजली क्षीरसागर ही साधिका असल्यामुळे मला तिचा पुष्कळ आधार वाटत होता. संत सहजच माझ्याशी इतर विषयांवरही बोलले. तेव्हा मी पुष्कळ हसले. त्या वेळी अंजलीताईच्याही तोंडवळ्यावर आनंद दिसत होता. ती माझ्यासाठी आनंदी झाली होती आणि माझ्या आनंदात तिने तिचा आनंद शोधला होता. तिचा तो आनंदी तोंडवळा मी कधीच विसरणार नाही. त्या क्षणी मला तिच्यातील ‘त्याग’ या गुणाची जाणीव झाली. हा माझ्यासाठी अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय दिवस होता.
२. घरच्यांच्या आजारपणाचा ताण विसरून साधिकेच्या आनंदात निर्मळ मनाने सहभागी होणारी अंजलीताई !
मध्यंतरी घरातील सदस्य आजारी असतांना अंजलीताई रामनाथी आश्रमात राहून सर्व कुटुंबियांना भ्रमणभाषवरून संपर्क करत होती. त्यांची काळजी घेत होती आणि त्यांना लागणार्या सर्व गोष्टींसाठी समन्वयही करत होती. या सर्व गडबडीतच संतांना एक सेवा दाखवायची असतांना ताई घरच्यांचे आजारपण विसरून केवळ माझ्यासाठी आनंदी झाली. मी तिच्या जागी असते, तर माझ्या घरच्यांच्या काळजीने मी अस्थिर आणि हळवी झाले असते. ‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.
अंजलीताई, तुला वाढदिवसाचा नमस्कार ! ‘ताई लवकर संत व्हावी आणि तिने तिच्या समवेत आम्हा सगळ्यांना साधनेत पुढे घेऊन जावे’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. स्मितल भुजले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |