‘नेटफ्लिक्स’चे दुष्परिणाम !
सध्याचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. या युगात ‘ऑनलाईन’च्या माध्यमातूनच अल्पावधीत आपले स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले जाते. त्याद्वारे लोकांचे चार भिंतींच्या आडही अमर्याद मनोरंजनही करण्यात येते. याचेच एक उदाहरण म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार इत्यादी ! सध्याच्या विश्वात ‘नेटफ्लिक्स’ न वापरणारे विरळाच सापडतील. ही माध्यमे म्हणजे नव्या पिढीचे आकर्षणच ठरत आहेत. जो तो त्यात डोके खुपसून बसलेला आढळतो. ‘नेटफ्लिक्स’च्या मायाजाळात अडकलेल्यांनी आता मात्र डोके वर काढण्याची वेळ आली आहे. युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार याच ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होत आहे. हे अतीचिंताजनक आहे. मोठ्या आकाराचे किंवा उच्च प्रतीचे व्हिडिओ संग्रहित करण्यासाठी मोठ्या ‘डेटा सेंटर’ची आवश्यकता असते. त्यासाठी अधिक विद्युत् ऊर्जा लागते. त्यामुळे या माध्यमातून अप्रत्यक्षपणे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जनच वाढते. ‘स्मार्टफोन’वर एखादा व्हिडिओ प्रवाहित केल्याने प्रमाणातील परिभाषेपेक्षा (‘स्टँडर्ड डेफिनिशन’पेक्षा) ‘ग्रीनहाऊस गॅस’चे जवळपास आठपट उत्सर्जन होते. जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे. ‘नेटफ्लिक्स’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० मिनिटांचा एखादा व्हिडिओ पहाण्यातून चारचाकी वाहन ६ कि.मी. इतके चालवण्याइतका कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होतो, असे वैज्ञानिकांनी निष्कर्षात सांगितले आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यताही आहे. त्यामुळे भविष्यात याचे भयंकर परिणाम होऊ नयेत, यासाठी संशोधकांनी ‘नेटफ्लिक्स’च्या प्रसारणाविषयीच्या काही मर्यादांचे पालन करण्याचे, तसेच दरडोई कार्बनचे उत्सर्जन न्यून होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावरील उत्सर्जनामध्ये डिजिटल क्षेत्राचे जगभरातील योगदान हे १ ते ९.९ टक्के असे आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता वापरच याला कारणीभूत आहे. ‘नेटफ्लिक्स’च्या दाव्यानुसार १ घंटा केलेल्या व्हिडिओच्या प्रसारणातून १०० ग्रॅमपेक्षाही न्यून असा कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित होतो. संशोधक किंवा वैज्ञानिक आणि ‘नेटफ्लिक्स’ यांच्या म्हणण्यात काहीसा भेद असला, तरी वैज्ञानिकांच्या निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वर्ष २०२० मध्ये जर्मन सरकारच्या पाठिंब्याने शास्त्रज्ञांनी हे उत्सर्जन न्यून होण्यासाठी काही प्रमाणात अभ्यासही केला होता. सर्वच देशांनी अशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत. इंग्लंडमधील शेफिल्ड हॅलॅम विद्यापिठातील ज्येष्ठ व्याख्याते बर्नाडी प्रॅन्गगोनो यांनी म्हटले आहे की, लोकांनी ‘नेटफ्लिक्स’वर मालिका पहाण्यापेक्षा ते ३० मिनिटे चालायला गेले, तर ते सर्वांच्याच, अगदी ग्रहांच्या दृष्टीनेही लाभदायक ठरेल; पण बाजारात किंवा चित्रपटगृहात जाण्यासाठी ३० मिनिटे गाडी चालवली, तर ते उपयुक्त ठरणार नाही. ‘नेटफ्लिक्स’च्या विश्वात अडकलेल्या सर्वांनीच वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.
वापरकर्ते कोट्यवधींच्या घरात !
‘नेटफ्लिक्स’ची स्थापना २९ ऑगस्ट १९९७ या दिवशी कॅलिफोर्निया येथे करण्यात आली होती. ‘नेटफ्लिक्स’ हे सद्य:स्थितीत जागतिक पातळीवरील सर्वांत मोठे स्ट्रीमिंग करणारे आस्थापन आहे. वर्ष २००० मध्ये ‘नेटफ्लिक्स’चे २ लाख ग्राहक होते. वर्ष २०११ मध्ये एकट्या अमेरिकेत ‘नेटफ्लिक्स’चे २ लाख आणि जगभरात २० लाखाहूनही अधिक ग्राहक होते. वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीच्या काळात ‘नेटफ्लिक्स’ वापरकर्त्यांच्या संख्येत पुष्कळ वाढ झाली असून ती संख्या २० कोटींहून अधिक झाली आहे. त्याच्या मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. ऊर्जाक्षेत्रांवरही या संख्येमुळे अतिरिक्त भार पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात जर ‘नेटफ्लिक्स’चा वापर वाढत असेल, तर वैज्ञानिकांनी मांडलेल्या मतानुसार याचा ग्रह आणि पर्यावरण यांवर किती हानीकारक अन् भयानक परिणाम होऊ शकतो, याची कल्पना करता येते. ही भयावहता टाळण्यासाठी सर्वच देश आणि देशातील नागरिक यांनी पर्यावरणीय र्हास करणार्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरावर नियंत्रण ठेवायला हवे, तसेच सर्वत्रची ऊर्जा क्षेत्रे सुसज्ज करायला हवीत.
दिशाहीन ‘नेटफ्लिक्स’ !
‘नेटफ्लिक्स’ हे माध्यम जसे अवकाशातील ग्रहगोलावर प्रतिकूल परिणाम करणारे आहे, तितकेच ते मानवी आयुष्य, समाज आणि मन यांवरही परिणाम करत आहे. या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार्या वेब सिरीज नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी तर सोडाच; पण इंग्रजी चित्रपटसृष्टीलाही लाज वाटेल अशा प्रकारच्या वेब सिरीज या माध्यमातून प्रसारित होत आहेत. शैक्षणिक, भौगोलिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय अशा विषयांवर नव्हे, तर केवळ अन् केवळ धर्म, जात, अश्लीलता, पैसा, गुन्हेगारी जगत, विवाहबाह्य संबंध, ड्रग्स, पुरोगामित्व अशाच गोष्टींवर आधारित मालिका प्रसारित केल्या जातात. मनोरंजनाच्या लाटेवर स्वार झालेले ‘नेटफ्लिक्स’ अशा विषयांतून समाजाला कुठे नेऊ पहात आहेत ? दिशा तर नाहीच, उलट स्वतः दिशाहीन होऊन समाजालाही भरकटवले जात आहे. समाज आणि संस्कृती पोखरली जात आहे. ‘नेटफ्लिक्स’च्या साम्राज्याने पृथ्वी, अवकाश, ग्रह यांना गवसणी घालत मानवी मनाचाही तळ गाठला आहे. अर्थात् ही गवसणी प्रगतीशील नक्कीच नाही. त्यामुळे ‘कलियुगाला लवकरात लवकर विनाशाच्या मार्गावर नेण्याचे कामच ‘नेटफ्लिक्स’सारखी माध्यमे करत आहेत’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ‘नेटफ्लिक्स’च्या जंजाळातून, तसेच त्याच्या भविष्यातील भयावह परिणामांपासून वाचण्यासाठी आता नागरिकांनीच सजग आणि सतर्क होऊन या माध्यमांवर बहिष्कार घालायला हवा, हाच यातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.