मालवण येथील पारंपरिक मासेमारांचे साखळी उपोषण चालूच मासे खरेदी-विक्री बंद
स्थानिक व्यावसायिकांचा आंदोलनाला पाठिंबा
मालवण – परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर आणि प्रकाशझोतातील मासेमारी यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली पारंपरिक मासेमारांनी १२ मार्चपासून साहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर चालू केलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या ७ व्या दिवशीही चालू होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता विविध हालचालींना वेग आला आहे. सागरी पर्यटन व्यावसायिकांचा मालवणमध्ये कडकडीत बंद .एरव्ही पर्यटकांमुळे गजबजणारा दांडी समुद्रकिनारा १७ मार्चला पूर्णतः शांत होता. येथील साहसी जलक्रीडा पर्यटन व्यावसायिकांनी पारंपरिक मासेमारांच्या साखळी उपोषण आंदोलनास पूर्ण पाठिंबा दर्शवत व्यवसाय पूर्णतः बंद ठेवला.
मत्स्य खरेदी-विक्री दोन वेळा बंद
मालवण किनारी प्रतिदिन सकाळी माशांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. हे आंदोलन चालू झाल्यापासून दोन वेळा माशांची विक्री आणि खरेदी बंद ठेवण्यात आली होती. १८ मार्चलाही माशांची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आल्याने या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी आलेल्यांना माघारी परतावे लागले होते.
आमदार वैभव नाईक यांनी घेतली मत्स्य आयुक्तांची भेट
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे यांची मुंबई येथे भेट घेऊन उपोषणकर्त्या मासेमारांच्या मागण्यांविषयी चर्चा केली. व्यापारी संघटनेचा पारंपरिक मासेमारांना पाठिंबा या आंदोलनाला मालवण व्यापारी संघ आणि जिल्हा व्यापारी संघ यांनी पाठिंबा दर्शवला आहे. व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आंदोलनस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.
राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनात सहभागी होणार
पारंपरिक मासेमारांच्या मागण्यांविषयी मत्स्य विभागाकडून अभिप्राय दिला न गेल्यास राज्यमंत्री बच्चू कडू स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.
पर्ससीनधारक व्यावसायिकांचे हक्क हिरावून घेऊ नका !
मालवण – पारंपरिक मासेमारांकडून सातत्याने अनधिकृत पर्ससीनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. प्रत्यक्षात आम्ही अधिकृत पर्ससीनधारक असून आमच्याकडे मासेमारीसाठीचा परवाना आहे. तसेच १२ नॉटिकल सागरी अंतराच्या बाहेर मासेमारी करण्याचे अधिकार आम्हाला कायद्यानुसार प्राप्त झाले आहेत. घटनेने आम्हाला जो अधिकार दिला आहे, तो हिरावून घेण्याचे काम केले जात असून ते चुकीचे आहे. आमचे पारंपरिक मासेमारांशी वैर नाही. आम्हाला कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारानुसारच आम्ही व्यवसाय करत आहोत. त्यामुळे पारंपरिक मासेमारांनी कायदा समजून घ्यावा, असे मत पर्ससीनधारक व्यावसायिक अशोक सारंग यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सध्या चालू असलेल्या पारंपरिक मासेमारांच्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सारंग आणि त्यांच्या सहकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.