शरजील उस्मानीचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला !
एल्गार परिषदेत हिंदूंना ‘सडलेला’ म्हटल्याचे प्रकरण
पुणे – अलिगड मुस्लिम विद्यापिठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने येथे ३० जानेवारी २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत ‘हिंदु समाज सडलेला आहे’, असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी भाजपचे नेते प्रदीप गावडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात १५३ अ कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. उस्मानीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून गुन्हा रहित करण्याची मागणी केली होती. ‘पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करता उस्मानीचा जबाब नोंदवून घ्यावा’, असे न्यायालयाने सांगून उस्मानी त्याला स्वारगेट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शरजील उस्मानी १८ मार्च या दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्यात उपस्थित राहिला. पोलिसांनी त्याची ३ घंटे चौकशी करून जबाब नोंदवला.