आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांकडून झालेल्या अक्षम्य चुकांमुळे परमवीर सिंह यांचे स्थानांतर ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तांंचे स्थानांतर हे नियमितचे नव्हते. सचिन वाझे यांच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांच्या अन्वेषणातून काही सूत्रे समोर आली. मुंबई पोलीस प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या सहकार्यांकडून अक्षम्य चुका झाल्या. त्या क्षमा करण्यासारख्या नाहीत. अन्वेषणात अडथळा येऊ नये, यासाठी परमवीर सिंह यांच्या स्थानांतराचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.
या वेळी अनिल देशमुख म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस यांची जगात ख्याती आहे. काही पोलीस अधिकार्यांनी चुका केल्या. अन्वेषणात जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होणार आहे. स्फोटकांचे सूत्रे येते, तेव्हा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अन्वेषण करतेच. दोषींना अन्वेषण यंत्रणा शोधून काढेलच. काही गोष्टी माध्यमांपुढे बोलता येत नाहीत. साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याला सेवेत आणण्यासाठी समिती आहे. ही समिती आढावा घेऊन त्यांना सेवेत सहभागी करून घेतले जाते. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप राजकीय आहेत. या धारिका सरकारकडे येत नाहीत. सचिन वाझे यांसारख्या साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याला सेवेत परत घेण्याचा अधिकार ना मला आहे, ना मुख्यमंत्र्यांना ! तो अधिकार आयुक्त स्तरावरील समितीला आहे.’’