मंदिरे हीच ‘लक्ष्य’ !
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील डासना क्षेत्रात असलेले देवीचे मंदिर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. देशात एखादी गोष्ट चर्चेत येणे अथवा आणली जाणे; म्हणजे त्यासंबंधी काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळे अथवा बहुतेक वेळी तो सिद्ध केल्यामुळे ! डासनादेवी मंदिराची गोष्टही काहीशी तशीच ! काही दिवसांपूर्वी आसिफ नावाच्या एका १४-१५ वर्षांच्या ‘कोवळ्या’ मुलाने मंदिराच्या प्रांगणात येऊन पाणी प्यायल्यामुळे म्हणे त्याला मंदिरातील हिंदु भाविकांनी चोपले ! अशा प्रकारे बातम्या प्रसिद्ध झाल्या. दुसरी बाजू जाणून न घेता हिंदूंना नेहमीप्रमाणे आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यात आले. ज्या प्रकारे डासनापासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर असलेल्या दादरीमध्ये साडेपाच वर्षांपूर्वी अखलाक या मुसलमानाची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्यावरून राहुल गांधी, केजरीवाल यांपासून देशातील सर्वच ‘धर्मनिरपेक्षता’वादी पक्षांच्या नेत्यांनी त्याच्या घराबाहेर रांगा लावल्या होत्या, तोच कित्ता आता या ‘कोवळ्या’ मुलाच्या संदर्भात गिरवला जात आहे.
डासनादेवी मंदिराचे मुख्य पुजारी यति नरसिंहानंद सरस्वतीजी यांनी मंदिराच्या गेल्या काही वर्षांच्या इतिहासाचा पाढा या निमित्ताने वाचून दाखवला आहे. ‘शांतीपूर्ण’ समाजाची तब्बल ९५ टक्के लोकसंख्या असलेल्या डासना क्षेत्रातील हिंदूंचे हे एकमेव मंदिर असून धर्मांधांनी येथील काही साधूंच्या हत्या केल्या आहेत. मंदिरातील अनेक महंतांनी धर्मांधांच्या भयाने पलायन केले आहे. धर्मांधांनी मंदिरात घुसून अनेक वेळा चोर्या करून लक्षावधी रुपये पळवले आहेत. शेजारील गावांमधून दर्शन घेण्यासाठी येणार्या महिला भाविकांची येथील धर्मांधांकडून छेड काढण्यात येणे, हे नित्याचे झाले. या सगळ्याला कंटाळून मंदिर व्यवस्थापनाने टोकाची भूमिका घेत मंदिराच्या बाहेर ‘मुसलमानांना मंदिर प्रवेशास मनाई आहे’, या आशयाचा फलक काही वर्षांपूर्वी लावला. फलक असतांनाही ‘आसिफ पाणी पिण्याचे निमित्त करून मंदिराच्या प्रांगणात आला आणि चोरी करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळेच उपस्थित हिंदूंनी त्याला चोप दिला’, असे यति नरसिंहानंद सरस्वतीजी यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण समोर येताच फलकाचा विषयही प्रसिद्धीच्या झोतात आला. या फलकावरून आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. ‘आसिफवरील सांप्रदायिक अन्याय’ अशा प्रकारे हिंदूंवर लांच्छन लावणारी प्रसारमाध्यमे मंदिराचा ‘जिहादी आक्रमणकारी’ इतिहास मात्र सांगत नाहीत. तसेच साम्यवाद्यांपासून धर्मनिरपेक्षतावाद्यांपर्यंत, समाजवाद्यांपासून पुरो(अधो)गाम्यांपर्यंत एकजात सर्वांनी हा विषय चघळायलाही आरंभ केला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
सर्वधर्मसमभाववाल्यांना पोटशूळ का ?
भारतातील बहुतेक मशिदींमध्ये अहिंदूंना प्रवेश करण्यास मनाई असल्याचे सर्वधर्मसमभाववाल्यांना चालते; पण एखाद्या मंदिरात स्वरक्षणार्थ मुसलमानांना प्रवेशाची अनुमती नाकारली, तर लगेच आरडाओरड होते ? केरळमधील चर्चमध्ये महिलांनी सभ्य पेहराव करण्याचे नियम स्वीकारले जातात; पण शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा केवळ फलक लावल्यावरून पोटशूळ उठतो ? हिंदु धर्माचे सर्वोच्च धार्मिक क्षेत्र असलेल्या अयोध्येत मुसलमानांना मशीद उभारण्यासाठी हिंदूंनी ५ एकर भूमी दिली, तर त्यावर कुणी आभाराचे चार शब्दही बोलत नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. आता डासनादेवी मंदिराच्या बाहेर लावलेल्या फलकाच्या वादातून जर कुणी ‘दर्ग्यात येणार्या हिंदूंना चोपा’, असे म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात् या निमित्ताने ‘धर्मशिक्षणा’चा गंध नसलेल्या आणि ‘दर्ग्यात चादर चढवून माथा टेकणार्या हिंदूंना अद्दल घडेल’, असे कुणा हिंदुत्वनिष्ठाने म्हटल्यास त्यातही अयोग्य असल्याचे वाटत नाही. असो.
धर्मांधांमुळे देशाची होत असलेली दुरवस्था
जिथे धर्मांधांची संख्या वाढत जाते, तिथे ते वरचढ होत जातात, हा जागतिक इतिहास आहे. भारतही त्याला अपवाद नाही. डासनाचे उदाहरण पाहिल्यास त्याचा अनुभव येतो. डासना येथील धर्मांधांनी त्यांना मंदिरात येण्यापासून मज्जाव केल्यावरून प्रखर विरोध करायला आरंभ केला आहे. येथील बसपचे आमदार अस्लम चौधरी यांनी अरेरावीची भाषा करत स्थानिक हिंदूंना पूज्य असलेल्या यति नरसिंहानंद सरस्वतींना ‘माफिया’ संबोधले. चौधरी यांनी ‘मला मंदिरात जाण्यापासून कोण रोखते, हे मी पहातो. हे मंदिर आमच्या पूर्वजांनी निर्माण केले आहे’, अशी धमकी दिली आहे. धर्मांधबहुल क्षेत्राची दुरवस्था देशातील जवळपास प्रत्येक शहर, नगर आणि गाव येथील हिंदूंनी अनुभवली आहे. याची व्यापक रूपे म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश ही इस्लामी राष्ट्रे होत ! हिंदु जागृत झाला नाही, तर येणार्या काही वर्षांत भारताचे आणखी किती लचके तोडले जातील, याची गणती नाही.
हिंदूंचे दबावगट सिद्ध करा !
डासनादेवी मंदिराच्या प्रकरणात काय होते, ते आता पहावे लागेल; परंतु या प्रातिनिधिक घटनेतून एक मोठ्या घटनेसंबंधी विचारप्रवण होण्याची आवश्यकता आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला, हिंदूंची श्रद्धाकेंद्रे नि आध्यात्मिक शक्ती प्रदान करणारी धार्मिक ठिकाणे आहेत. हिंदु धर्माला नामशेष करायला निघालेली ‘इकोसिस्टम’ (व्यापक व्यवस्था) त्याचे मूळ स्रोत असलेल्या मंदिरांवर त्यामुळेच आघात करत आहे. सर्वपक्षीय सरकारांच्या माध्यमांतून यामुळेच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते. नुकतेच ओडिशातील बिजू जनता दल सरकारने जगन्नाथपुरी मंदिराच्या मालकीची ३५ सहस्र एकर भूमी विकण्याचे ठरवले आहे. तमिळनाडू सरकारच्या कह्यात असलेल्या ३७ सहस्र मंदिरांची देखभाल करायला केवळ एकच व्यक्ती, तर ११ सहस्र ९९९ मंदिरांना एकही पुजारी नाही. महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांची दु:स्थिती तर जगजाहीर आहेच. यातून सरकार कुणाचेही असो, या माध्यमातून हिंदु मंदिरांवर येनकेन प्रकारेण आघात केले जातात, हेच सत्य आहे. गेली १ सहस्र वर्षे इस्लामी आक्रमकांनी ते केलेच आहे. आज जनतानियुक्त सर्वपक्षीय सरकारांकडून ती लुटली जात आहेत. तमिळनाडूप्रमाणे अनेक राज्यांतील असंख्य मंदिरे दुर्लक्षित स्थितीत श्वास कंठित आहेत. मंदिरांवरून राजकारणही केले जाते. काही वर्षांपूर्वी जम्मूतील कठुआमध्ये अल्पसंख्यांकांच्या एका मुलीवर हिंदूंनी बलात्कार केल्याची आवई उठवत आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याचे विसरता येणार नाही.
डासनादेवी मंदिराच्या विषयाच्या निमित्ताने मंदिरांवरील आघात परतवून लावण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन कृतीप्रवण व्हायला हवे. हिंदूंनी स्वतःची ‘हिंदु इकोसिस्टम’ निर्माण करण्यास (आर्थिक, सामाजिक, न्यायिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व स्तरांवर व्यापक हिंदूसंघटन करून दबावगट सिद्ध करणे) सज्ज व्हायला हवे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.