येत्या वर्षभरात देशातील सगळे टोल प्लाझा हटवून ‘फास्ट टॅग’द्वारे टोल वसूल करणार ! – नितीन गडकरी यांची लोकसभेत घोषणा
नवी देहली – मागील (काँग्रेसच्या) सरकारमध्ये रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी शहराच्या सीमेवर असे अनेक टोल प्लाझा बांधले गेले आहेत. हे निश्चितच चुकीचे आणि अन्यायकारक आहे. आता टोल प्लाझा हटवण्यात आले, तर रस्ते बनवणारी आस्थापने हानीभरपाई मागतील; परंतु केंद्र सरकारने एका वर्षात सगळे टोल प्लाझा हटवण्याची योजना बनवली आहे. देशभर फास्ट टॅगची संपूर्ण कार्यवाही करून एका वर्षात टोल घेण्याची व्यवस्था रहित केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली. ‘येणार्या काळात नागरिकांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जेवढा वेळ रस्त्यावर वाहन चालणार तेवढा टोल भरावा लागेल’, अशी घोषणाही त्यांनी केली. गडकरी म्हणाले की, टोल प्लाझा संपुष्टात आणण्याच्या योजनेत तुम्ही महामार्गावर जिथून चढाल आणि बाहेर पडाल तिथे जीपीएस्च्या साहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरा तुमचे एक छायाचित्र घेईल. तुम्ही जेवढा प्रवास केला असेल तेवढ्याच अंतराचा टोल तुम्हाला भरावा लागेल.