सातारा जिल्ह्यात बेरोजगारी आणि गरिबीतून ३ युवकांची आत्महत्या !
परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. आत्मबळ साधनेनेच निर्माण होते. धर्मशिक्षणामुळे साधनेचे महत्त्व मनावर बिंबते. शासनाने आता तरी शालेय शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करावा, ही अपेक्षा आहे.
सातारा, १८ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा कहर, व्यवसायातील मंदी आणि रोजगाराची संधी नसल्याने घरी बसून असलेल्या युवकांच्या मनात कोलाहल चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावात एकाच दिवशी ३ युवकांनी आत्महत्या केली.
पहिल्या घटनेत उद्योग-धंदा नसल्याने वडूथ येथील सागर भगवान कांबळे (वय २२ वर्षे) या युवकाने रहात्या घरात अँगलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. दळणवळण बंदीमुळे सर्वच उद्योग-धंद्यांना फटका बसला आहे. त्यातच सागर कांबळे हा उद्योगाशिवाय १ वर्षापासून बेरोजगार होता.
दुसर्या घटनेत आसगाव येथील आकाश बापू मोझर (वय २२ वर्षे) यांनी रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिसर्या घटनेमध्ये वाई तालुक्यातील एका युवकाने नोकरी लागत नसल्याने लग्न होत नाही, या कारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.