तक्रारीनंतर प्रयागराज येथील मशिदीने भोंग्यांची दिशा पालटून आवाजही केला न्यून !

  • मशिदीवरील भोग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे होणार्‍या त्रासाचे प्रकरण

  • कुलगुरूंच्या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासन अद्याप निष्क्रीयच !

प्रशासनाकडे तक्रार करूनही जर प्रशासन निष्क्रीय रहाणार असेल, तर असे प्रशासन काय कामाचे ? राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन राज्यातील सर्वच मशिदींमुळे अशा प्रकारच्या होणार्‍या त्रासापासून जनतेची सुटका करावी, असेच हिंदूंना वाटते !

अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे होत असलेल्या त्रासाची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केल्यानंतर सिव्हील लाईन येथील लाल मशिदीवर असलेल्या भोंग्याची दिशा मशिदीकडून पालटण्यात आली आहे. तसेच आवाजही न्यून करण्यात आला आहे. प्रशासन किंवा पोलीस यांच्याकडून मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मशिदीत असलेले महंमद कलिम यांनी सांगितले, ‘आम्ही सकाळी वृत्तपत्र वाचले, तेव्हा आम्हाला या आवाजाने कुणालातरी त्रास होत आहे, हे लक्षात आले. (मशिदींवरील भोंग्यांमुळे भारतातील कोट्यवधी लोकांना त्रास होत आहे; मात्र प्रशासन आणि पोलिस यांची शेपूट घालण्याच्या वृत्तीमुळे जनतेने तक्रार केल्यावरही कारवाई करण्याचे कुणाचेही धाडस होत नाही. हे ठाऊक असूनही अशा प्रकारचे विधान करून स्वतःचा बचाव करण्याचाच हा प्रयत्न आहे ! – संपादक) त्यानंतर आम्ही सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला की, कुणाला त्रास होत असतांना आपण करत असलेली सेवा योग्य नाही. त्यामुळे आम्ही कुलगुरूंच्या घराकडे असलेल्या ध्वनीक्षेपकाची दिशा पालटून रस्त्याच्या दिशेने केली. येथे ५ वेळा अजान होते. या ठिकाणी आधीपासूनच ध्वनीक्षेपक लावण्यात आले होते. सकाळच्या वेळी वर्दळ अल्प असते. गोंगाटही नसतो. त्यामुळे तो आवाज मोठा वाटतो. आता आम्ही आवाज आणखी न्यून केला आहे. आता सकाळच्या वेळी कुणाला त्रास होत असेल, तर आम्ही त्याचा आवाज आणखी अल्प करू जेणेकरून तो आवाज ५० किंवा १०० मीटरपर्यंतही जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (कुणाला त्रास होईल, हे कुणीतरी तक्रार केल्यावर समजण्यापेक्षा आधीच ते का केले जात नाही ? – संपादक)

आवाजाचा त्रास होऊनही पोलीस निष्क्रीय !

कुलगुरूंच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनीदेखील या आवाजामुळे त्रास होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘अजान सकाळी ५ ते ५.३०च्या मध्ये होते आणि त्याचा आवाजही अधिक असतो. संपूर्ण रात्र जागल्यानंतर सकाळी इतका मोठा आवाज आला, तर त्रास तर होणारच.’’ (जर न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती आहे, तर पहाटे ५ वाजता ध्वनीक्षेपक लावण्यात येते हे समजूनही त्यावर या पोलिसांनी कारवाई का केली नाही ? हिंदूंच्या धार्मिक स्थळांकडून असे कृत्य करण्यात आले असते, तर पोलीस शांत राहिले असते का ? त्यामुळे अशा निष्क्रीय पोलिसांवरच प्रथम कारवाई केली पाहिजे ! – संपादक) कुलगुरु यांचे निवास आणि मशीद यांतील अंतर ३०० मीटर इतके आहे.