संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवासाठी २९ मार्चला देहू (जिल्हा पुणे) येथे उपस्थित रहावे !
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे वारकर्यांना आवाहन
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १८ मार्च (वार्ता.) – सध्या कोरोनाच्या नावाखाली सरकार सर्रास तीर्थक्षेत्रांवरील यात्रा आणि सांप्रदायिक सप्ताह बंद करत आहे. हे किती दिवस चालणार ? मागील वर्षी आषाढी, कार्तिकी, माघ वारी, तसेच संत ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा झाला नाही; मात्र सर्व सांप्रदायिक, संघटना, संस्था आणि गोवोगावच्या भजनी मंडळांना आवाहन करतो की, आपण संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवासाठी २९ मार्च या दिवशी (फाल्गुन वद्य प्रतिपदा) दुपारी ४ वाजेपर्यंत देहू (जिल्हा पुणे) येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय सहिष्णु आहे, याचा अर्थ तो दुर्बल आहे असे नाही. ‘संप्रदाय सकळांचा येथूनिया’, अशा अधिकाराचे असणारे संत तुकाराम महाराजांचा बीजोत्सव होत नही म्हणजे ‘वारकरी संप्रदाय निस्तेज झाला’, असे होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपलब्ध होईल त्या वाहनाने २९ मार्च या दिवशी देहू येथे उपस्थित रहावे, तसेच प्रतिवर्षी येणार्या दिंडीसमूहाने नेहमीप्रमाणे देहू येथे यावे.