सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी येणार्यांना कोरोनाविषयीची चाचणी करणे बंधनकारक
सिंधुदुर्ग – शिमगोत्सवासाठी जिल्ह्यात येणार्या नागरिकांनी ७२ घंट्यांपूर्वी केलेल्या आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सोबत ठेवावा, तसेच या उत्सवाविषयीच्या सविस्तर सूचना जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत, त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या बाहेरून येतांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे शक्य न झाल्यास नागरिकांनी जिल्ह्यात येताच त्याच दिवशी संबंधित गावातील जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे घशातील स्रावाची तपासणी (स्वॅब टेस्ट) करून घ्यावी. ‘स्वॅब टेस्ट’चा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित व्यक्तींनी गृहअलगीकरणात रहावे. ‘स्वॅब टेस्ट’चा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यास आरोग्य यंत्रणेच्या समादेशाने पुढील उपचाराची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती
१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १८
२. उपचार चालू असलेले रुग्ण १७०
३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र २८१
४. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १७७
५. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र ६३४