थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

उदयनराजे  भोसले

सातारा, १७ मार्च (वार्ता.) – दळणवळण बंदीचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे. सर्व क्षेत्रांतील व्यावसायिक आणि शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. वीजदेयके थकवल्यामुळे शेतकरी बांधवांची वीजजोडणी महावितरणकडून तोडली जात आहे. थकबाकीविषयी टप्प्याटप्प्याने वीजदेयके भरण्याचा निर्णय घेऊन महावितरणने कोरोना महामारीने त्रस्त असणार्‍या जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, अशी चेतावणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘देहलीसारख्या राज्यात वीजदेयक काही युनिटपर्यंत विनामूल्य आहे. तसेच प्रतियुनिट वीजदर अत्यंत अल्प आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्रातील वीज वितरण आस्थापन अग्रेसर आहे. महाराष्ट्रासाठी आवश्यक असणार्‍या वीजेपैकी निम्मी वीज सातारा जिल्ह्यात निर्माण होते. सध्या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. वीजेअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ शकते. कोरोनामुळे ३-४ मास वीजदेयके देण्यात आली नव्हती. नंतर एकत्रित वीजदेयके दिल्यामुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच सरासरी युनिटचे देयक ग्राहकांना दिल्यामुळे त्यांची दुहेरी आर्थिक हानी झाली आहे. थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू. अशा कारवाईत कुणाची वीजजोडणी तोडली, तर अशांचा आढावा घेऊन त्याविषयीचा सोक्षमोक्ष लावतांना संघर्ष अटळ आहे.’’