होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्या अपप्रकारांना आळा घाला !
हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्गातील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्ग – होळी आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वेंगुर्ले येथे पोलीस अन् तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. होळी हा दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार नष्ट करण्याचा उत्सव आहे; मात्र सध्या या उत्सवांत अनेक अपप्रकारांनी शिरकाव केला आहे. मद्यपान करणे, महिलांकडे बघून अश्लील अंगविक्षेप करणे, रंगपंचमीच्या दिवशी घातक रंगांचा वापर करणे आदी अपप्रकार केले जातात. यामुळे महिला, वृद्ध नागरिक, लहान मुले यांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे.
२. या उत्सवांचे पावित्र्य राखणे, महिलांना सुरक्षित वाटावे, तसेच रासायनिक रंगांची विक्री होऊ नये, यांसाठी पोलिसांनी गस्तीपथके कार्यरत ठेवावीत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात अशी कृत्ये करणार्यांना त्वरित कह्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यांसह प्रबोधनपर हस्तपत्रकांचे वितरण करणे, सामाजिक संस्थांच्या साहाय्याने प्रबोधन चळवळ राबवणे आदी जनजागृतीपर उपाययोजना कराव्यात.
३. ‘कचर्याची होळी’सारख्या पर्यावरणास घातक असलेल्या संकल्पना राबवल्या जाऊ नयेत, तसेच चांगल्या वृक्षांच्या फांद्या न तोडता धर्मशास्त्र समजून होळी साजरी करावी.
४. सद्य:स्थितीत एकमेकांना रंग लावल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी विविध उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते, त्याप्रमाणे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी कठोर निर्बंध घालावेत. चिनी बनावटीचे रंग, पिचकारी, फुगे आदींच्या विक्रीवर बंदी घालावी.
पुढीलप्रमाणे प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन सादर
१. सावंतवाडी येथे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव यांना निवेदन देण्यात आले.
२. कणकवली येथे नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलीस ठाणे अंमलदार रमेश नारनवर आणि तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले.
३. कुडाळ येथे नायब तहसीलदार कमलाकर दाभोलकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, नगराध्यक्ष ओंकार तेली यांना निवेदन देण्यात आले.
४. वेंगुर्ला येथे तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रभारी पोलीस अधिकारी राजेंद्र हुलावळे यांना निवेदन देण्यात आले.
५. देवगड येथे तहसीलदार मारुति कांबळे आणि पोलीस ठाणे अंमलदार कु. अमृता सुभाष बोराडे यांना निवेदन देण्यात आले.
६. ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीने पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी निवेदन स्वीकारले.
७. मालवण येथे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयात लिपिक सौ. सुरेखा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
या सर्व ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक आणि धर्माभिमानी उपस्थित होते.