सचिन वाझे यांना ‘ऑपरेट’ करणार्या सरकारमधील लोकांचा शोध घ्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
देहली – परमवीर सिंह यांना पदावरून हटवून हे प्रकरण संपणार नाही. सिंह आणि वाझे हे छोटे लोक आहेत. त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, याचा शोध घ्यायला हवा. सचिन वाझे यांना ‘ऑपरेट’ करणार्या सरकारमधील लोकांचा शोध घ्या, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
Ex-Maha CM Devendra Fadnavis says he was ‘pressurised’ to reinstate Sachin Vaze in 2018 https://t.co/dIt3PYcPym
— Republic (@republic) March 17, 2021
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,
१. सचिन वाझे हे परमवीर सिंह यांना रिपोर्टिंग करत होते. त्यामुळे या प्रकरणात परमवीर सिंह हेही उत्तरदायी आहेत. सचिन वाझे यांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेचे काही मंत्री मला भेटण्यासाठी आले होते.
२. वर्ष २००८ मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेच प्रवेश केला होता. शिवसेनेत त्यांनी प्रवक्ता म्हणूनही काम केले आहे. शिवसेनेशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. कोरोनाचा बहाणा करून एका समितीची स्थापना करून सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले.
३. सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास खराब असतांना त्यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले. अतिरिक्त पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या सचिन वाझे यांच्याकडे पोलीस निरीक्षकपदाचे दायित्व देण्यात आले. त्यासाठी एका रात्रीत २ पोलीस अधिकार्यांचे स्थानांतर करून वाझे यांची क्राईम इंटेलिजेन्स युनिटच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नाही.
४. एकप्रकारे वसुली अधिकारी म्हणून सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर डान्स बार चालवण्याला सवलत देण्यात आली. ही घटनाही भयानक आहे.
मनसुख हिरेन मृत्यूचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवा !
सचिन वाझे यांनीच मनसुख यांना रात्री भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी मनसुख यांचा मृतदेह आढळला. मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला. या प्रकरणी आंतकवादविरोधी पथकाने ज्याप्रमाणे अन्वेषण करायला हवे, त्या प्रकारे अन्वेषण होतांना दिसत नाही. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवायला हवे. खरेतर आतंकवादविरोधी पथकाकडून सचिन वाझे यांना अटक व्हायला हवी होती. मी या प्रकरणातील पुरावे सादर केले नसते, तर सचिन वाझे यांना महात्मा ठरवण्यात आले असते. हा सर्व घटनाक्रम पहाता हे एकटे सचिन वाझे करू शकत नाहीत. याच्यामागे आणखी कोण आहेत, याचा शोध घ्यायला हवा, अशी मागणी या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कर्तव्याला अनुसरूनच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे ! – शिवसेनेचे खासदार संजय राऊत
१. कुणाच्या राज्यात कोण वसुली करत होते आणि त्यांचे वसुली इन्चार्ज कोण होते, यासंदर्भात किमान राजकारणातील लोकांनी तरी बोलू नये. हमाम में सब नंगे होते है ।
२. परमवीर सिंग यांचे स्थानांतर करणे हे सूत्रच नाही. ज्या प्रकारचे वातावरण झाले होते, त्यावर मुख्यमंत्र्यांना वाटले की, ज्या अधिकार्याविषयी शंका आहे, त्याचे अन्वेषण होईपर्यंत स्थानांतर व्हायला हवे. विरोधकांना हे सूत्र पुष्कळ मोठे वाटत आहे; पण हे सूत्रच नाही. जर विरोधकांना याचे सूत्र करायचे असेल, तर पुढील साडेतीन वर्ष त्यांनी ते तसे करत रहावे. सरकारचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही. जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात, तेव्हा कारवाई करणे हे आमचे कर्तव्य आहे.
३. आमचे कर्तव्य आम्ही जाणतो. त्याच कर्तव्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलतांना सत्यापासून फारकत घेत होते. मुंबईत जे घडले, त्यावर विधिमंडळात त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत; पण त्यामुळे तपासाचे सूत्रधार तेच आहेत, असे मानणे चुकीचे आहे.
४. एन्आयए आणि आतंकवादविरोधी पथक अन्वेषण करत आहे. अन्वेषण पूर्ण झाल्यावर त्यावर बोलू. भाजपाच्या कार्यकाळात यापेक्षा भयंकर घटना घडल्या आहेत. आम्ही त्यात कधीच हस्तक्षेप केलेला नाही. अन्वेषण करणे हा तेथील पोलिसांचा अधिकार असतो. केंद्रीय यंत्रणा तिथे कधी घुसल्या नाहीत.