पांडे-खानापूर (जिल्हा सातारा) सीमेलगत शेतात टाकलेल्या मळीने विहिरीचे पाणी होणार दूषित

वस्तीवरील जनावरांसह नागरिकांचेही आरोग्य धोक्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, १७ मार्च (वार्ता.) – पांडे-खानापूर सीमेलगत दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची शेतभूमी आहे. त्यांच्या शेजारी संतोष घाटे यांची शेतभूमी आहे. घाटे यांनी शेतात १० ते १२ ट्रॅक्टर मळी टाकली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून तेथे पुष्कळ प्रमाणात माशा घोंघावत आहेत. त्यामुळे जनावरांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मळीतील घातक रसायनामुळे पिण्याच्या पाण्याची विहीर दूषित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊन पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. याविषयी भुईंज पोलीस ठाणे आणि सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती तक्रारदार दिलीप चव्हाण यांनी दिली.