बारावी जीवशास्त्राच्या पुस्तकात व्याकरणाच्या चुकांसह वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक माहितीच्याही असंख्य चुका !
पुस्तकात व्याकरणाच्या मूलभूत चुकांपासून चुकीची वैज्ञानिक माहिती देण्यापर्यंतच्या चुका असणे हे गंभीर आणि लज्जास्पद आहे ! यावरून मंडळातील सदस्यांचा अक्षम्य निष्काळजीपणाच उघड होतो !
पुणे – राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पुस्तकात असंख्य चुका असल्याचे समोर आले आहे. पुस्तकात व्याकरणाच्या चुकांसह वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक माहितीच्याही चुका आहेत. वनस्पतीशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हेमा साने यांनी पुस्तकातील चुकांचा ८० पानी अहवाल बालभारतीला पाठवला आहे.
डॉ. साने गरवारे महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत. गेल्या वर्षी अकरावीच्या पुस्तकांतील चुका निदर्शनास आणून दिल्यावर आधी बालभारतीकडून चुका स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर काही चुका स्वीकारण्यात आल्या. नंतर पुस्तक पाहिले असता जवळपास सर्व चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. चुका स्वीकारून दुरुस्ती केल्याचे कळवण्याची तसदीही बालभारतीने घेतली नसल्याविषयी डॉ. साने यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. (चुका निदर्शनास आणून दिल्यावरही टाळाटाळ करणारे बालभारती मंडळ ! अशा सदस्यांना बालभारती मंडळातून हटवून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मंडळात पात्र व्यक्तींचा समावेश केला पाहिजे ! – संपादक)
यावर बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले की, पुस्तके प्रतीवर्षी अधीप्रमाणित केली जातात. पुस्तकांवर आलेल्या प्रतिसादानुसार पुढील वर्षीच्या आवृत्तीमध्ये दुरुस्त्या केल्या जातात. त्यानुसार बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकातील चुका दुरुस्त केल्या जातील.