सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा ! – श्रीनिवास पाटील, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा, १७ मार्च (वार्ता.) – कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह अनेक ठिकाणची सैन्य भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे युवकांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे. युवकांची सैन्यात भरती होण्याची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुक युवकांची संधी हिरावू नये, यासाठी भारत सरकारने ‘खास बाब’ म्हणून या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचेे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे गत १ वर्षापासून सैन्य भरती झालेली नाही. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे घेण्यात येते. विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा असून ती अद्यापपर्यंत चालू आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश युवक सैन्यात भरती होण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक परिश्रम घेतात; मात्र सैन्य भरती वारंवार पुढे ढकलली जात असल्याने त्यांचे स्वप्न भंग पावत आहे. कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती स्थगित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे इच्छुक युवकांची वयोमर्यादा संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे युवकांची सैन्य भरतीची वयोमर्यादा या वर्षासाठी वाढवून मिळावी.