सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

अमेरिकेच्या ब्राऊन विश्‍वविद्यालयाने आयोजित ‘ऑनलाईन’ चर्चेच्या वेळी भाजप सरकारवर टीका !

  • काँग्रेस ५५ वर्षे निवडणुका जिंकत होती. याचा अर्थ त्या काळात लोकशाही होती का, अशी शंका जनतेच्या मनात नेहमीच येत असते ! काँग्रेसने आणीबाणी लागू केल्यामुळे या शंकेला बळ मिळाले. याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ?
  • विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी ! असे नेते जनतेचे नेतृत्व करण्यास पात्र आहेत का ?
मुअम्मर गद्दाफी, राहुल गांधी आणि सद्दाम हुसेन

नवी देहली – इराकमध्ये सद्दाम हुसेन आणि लीबियामध्ये मुअम्मर गद्दाफी हेदेखील निवडणूक घेत होते ते जिंकूनही येत होते; मात्र याचा अर्थ असा नाही की, तिथे लोकशाही अस्तित्वात होती. लोक मते टाकत होती; परंतु ते खरे मत घोषित करत नव्हते; कारण त्यांच्या हितांचे संरक्षण सुनिश्‍चित करणारी कोणतीही संस्था तेथे योग्य पद्धतीने काम करत नव्हती. आपण या सीमारेषेच्याही खाली गेलो नाहीत ना, याचा भारताने विचार करायला हवा. केवळ लोकांनी जावे आणि मतदानयंत्राचे बटन दाबून परत यावे, याला लोकशाही म्हणत नाहीत.

देशातील शासन-प्रशासन व्यवस्था योग्य पद्धतीने काम करत आहे कि नाही ? न्यायपालिका निष्पक्ष आहे कि नाही ? आणि संसदेत कोणत्या सूत्रांवर चर्चा होते आहे, अशा अनेक सूत्रांशी निवडणुकीचा संबंध असतो, अशी विधाने करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली. ते अमेरिकेच्या ब्राऊन विश्‍वविद्यालयाने आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाईन चर्चेत बोलत होते. यात त्यांनी केंद्र सरकार, भाजप आणि रा.स्व. संघ यांच्यावर टीका केली.

परदेशी विश्‍वविद्यालयाने आयोजित चर्चेत बोलू शकता; मग भारतात का नाही? असा प्रश्‍न या वेळी विचारण्यात आल्यावर राहुल गांधी म्हणाले की, देशातील अनेक सूत्रांवर देशातील विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची इच्छा आहे; परंतु तुम्हाला हे देखील ठाऊक आहे की, यासाठी अनुमती मिळणार नाही. सर्वच विश्‍वविद्यालये मला बोलावून अशी चर्चा किंवा संवाद आयोजित करू शकणार नाहीत; कारण त्यांनी असे केले, तर त्या विश्‍वविद्यालयातून त्वरित कुलगुरूंना हटवण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.

 (सौजन्य : Republic World)

(काँग्रेस आणि त्यातही राहुल गांधी यांची राष्ट्रघातकी विचारसरणी भारतीय विद्यापिठांना आता कळल्यामुळे त्यांचे लोकशाहीवरील ‘अमोघ’ विचार ऐकायला कुणी उत्सुक नाहीत. असे असले, तरी जवाहरलाल नेहरू विद्यापिठात राहुल गांधी यांना नक्की बोलावले जाईल; कारण हे विद्यापीठ राष्ट्रघातक्यांचा अड्डा असल्यामुळे दोघांचेही विचार जुळतील ! – संपादक)