सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याची लक्षात आलेली वैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे
‘मार्च २०१८ पासून मला देवद आश्रमात ग्रंथांची ‘मागणी-पुरवठा’ या संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली. ‘प्रतिदिन करायची सेवा आणि व्यष्टी साधना करत असतांना मी करत असलेली सेवा किंवा व्यष्टी साधना योग्य होत आहे ना ?’, अशी मला शंका असे; पण आश्रमात, म्हणजे गुरूंच्या छत्रछायेखाली असल्यामुळे ‘गुरु योग्य ती साधना करवून घेणार आहेत’, अशी मला आतून निश्चिती होती.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात बसण्याची संधी मिळणे
अ. एकदा मी सेवा करत असतांना उत्तरदायी साधकांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात बसू शकता.’’ यावर मला ‘काय बोलायचे ?’, ते सुचेना. मी केवळ ‘कृतज्ञता ! कृतज्ञता !’ असे म्हणालो. ‘माझी व्यष्टी साधना अनियमित असूनही माझ्यासारख्या अज्ञानी, अपात्र जिवावर देवाने हा सत्संग देऊन कृपाच केली आहे’, असे मला तीव्रतेने वाटले.
आ. त्याच दिवशी मला सद्गुरु राजेंद्रदादा भोजनकक्षात भेटले. तेव्हा त्यांनी ‘तुम्ही मी घेत असलेल्या आढाव्यात आहात ना ?’, अशी निश्चिती केली.
२. व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या पहिल्याच दिवशी मनाचा अभ्यास करून यायला सांगणे, मनाचा अभ्यास करतांना गुरुदेवांची कृपा अनुभवणे आणि त्याविषयी आढाव्यात सांगतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मनाचा अभ्यास आवडल्याचे सांगणे
अ. प्रत्येक सोमवारी दुपारी ३.३० वाजता आमचा व्यष्टी साधनेचा आढावा असतो. आढाव्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी १ वाजता सद्गुरु राजेंद्रदादांनी मला आढाव्याला येतांना ‘मनाची स्थिती कशी आहे ?’ याविषयी लिहून आणण्यास सांगितले. मला क्षणभर काही सुचेना. ‘सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितले आहे, तर त्यांचा काही तरी संकल्प असणार’, असे मला वाटले.
आ. गुरुदेवांना प्रार्थना करून मी आढाव्याच्या एक घंटा आधी लिहिणे चालू केले. काही मिनिटांतच माझे मनाच्या स्थितीविषयी लिहून झाले. तेव्हा जाणवले, ‘गुरु आज्ञा करतात, तेव्हा आज्ञापालन करण्याची शक्तीही तेच देतात.’ ‘किती प्रेमळ आणि भक्तवत्सल आहे गुरुमाऊली !’ एवढ्या अल्प वेळात काही लिहिणे मला अशक्यप्राय वाटत होते.
इ. पहिल्या आढाव्यात सद्गुरु राजेंद्रदादांनी मला मनाची स्थिती वाचून दाखवायला सांगितली. त्यात मी माझ्या मनात येणारी ‘साधना योग्य होत आहे का ?’ ही शंका आणि व्यष्टी साधनेतील अनियमितता लिहिली होती. त्यावर सद्गुरु राजेंद्रदादांचे ‘‘व्यष्टीचे प्रयत्न नियमित होतील. ‘प्रांजळपणे स्थिती लिहिली आहे’, हे आवडले’, हे शब्द कानी पडले आणि मला धीर आला. मला उभारी आल्याचे जाणवले आणि ‘आता माझी साधना सद्गुरु राजेंद्रदादांच्या कृपेने योग्य दिशेने होणार’, असे मला जाणवले.
३. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकाच्या साधनेतील अडथळे लक्षात आणून देणे
माझी व्यष्टी साधना अनियमित होती. त्यात पुष्कळ खंड आणि चढ-उतार असे. मला याचे नेमके कारण कळायचे नाही. मला वाटायचे, ‘सेवा मनापासून होते; परंतु व्यष्टी साधना तेवढ्या तळमळीने मनापासून का होत नाही ?’ त्यावर सद्गुरु राजेंद्रदादांनी ‘तुमच्यात ‘आळस’ हा प्रबळ स्वभावदोष आहे’, असे मला सांगितले. प्रत्यक्षात मी लिहिलेल्या सारणीत आळशीपणाच्या एक-दोनच चुका होत्या आणि अन्य स्वभावदोषांच्या चुका होत्या. सद्गुरु राजेंद्रदादांनी अन्य स्वभावदोष आणि एकंदरीत स्थितीची पाळेमुळे ‘आळस’ या स्वभावदोषाशी निगडित असल्याने अपेक्षित असा पालट होत नसल्याचे सांगितले. यानंतर सद्गुरु राजेंद्रदादा यांनी आळस या स्वभावदोषाविषयी मार्गदर्शन केले.
४. ‘प्रबळ स्वेच्छेमुळे अहंचे प्रमाण वाढणे’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
४ अ. सद्गुरु राजेंद्रदादांनी मला अन्य स्वभावदोषांसह माझ्यात ‘स्व’चे विचार अधिक असल्याने ‘स्वेच्छा प्रबळ’ असल्याचे आणि त्यामुळे अहंचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आणून दिले. ते म्हणाले,
१. ‘‘स्वेच्छा’ हे तीव्र अहंचे प्रकटीकरण आहे.
२. ईश्वरेच्छेविना झाडाचे पानही हलत नाही, तर ‘स्वेच्छा बाळगणे’ किती व्यर्थ आहे !
३. मी स्वतः माझे प्रारब्ध पालटू शकत नाही. मनुष्य हा बाहुले आहे. ‘देवाच्या हातातील बाहुले व्हायचे कि दानवाच्या हातातील’, हे प्रत्येकाने ठरवायचे असते.
४. आपण क्षणोक्षणी स्वेच्छेने वागतो. कुणाशी स्वतःहून बोलायचे, कसे बोलायचे, हे ठरवून त्याप्रमाणे करतो. ‘प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करतांना ठराविक जागी आणि ठराविक साधकासह बसणे’, ही सगळी स्वेच्छा आहे’, हेही साधकांच्या लक्षात येत नाही. साधक आढावा देतांनाही ठरलेल्या जागीच बसतात.
५. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्या माध्यमांतून आपण ‘स्वेच्छेचेच’ पोषण करतो. आवडते खाणे, आवडते घेणे, आवडते संगीत ऐकणे, आवडते अत्तर वापरणे इत्यादी. स्वेच्छा ही पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे सतत प्रकट होत असते.
६. स्वेच्छेने वागल्याने तो संस्कार मनावर दृढ होत जातो, अहं वाढतो आणि अहं घट्ट होत जातो.’’
४ आ. स्वेच्छेवर मात करण्यासाठी करायचे प्रयत्न
१. एखाद्या साधकाने सांगितलेले सूत्र, जर साधनेची हानी होणारे नसेल, तर लगेच ऐकायचे. ते जेवढ्या तत्परतेने ऐकू, तेवढ्या गतीने अहं उणावण्यास साहाय्य होईल.
२. प्रसाद आणि महाप्रसाद वाढून घेतल्यावर दिसेल त्या जागेवर बसणे, समोर असेल त्या साधकाशी बोलणे, सहज कृती करणे, ठरवून स्वेच्छेने कृती करण्याचे टाळणे.
३. मिळालेली सेवा लगेच स्वीकारणे. ती परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्याने अध्यात्मात पैकीच्या पैकी गुण मिळतात. स्वीकारण्यास जेवढा वेळ अधिक लागतो, तेवढे गुण उणे होत जातात.
४. परेच्छेने वागण्याचे लाभ कळले की, स्वेच्छेने वागण्यावर मात करणे शक्य होते. यासाठी परेच्छेचे महत्त्व बुद्धीने समजून घ्यावे.
५. अशा रितीने स्वेच्छेतून परेच्छेकडे आणि परेच्छेतून ईश्वरेच्छेकडे साधकाचा प्रवास सुकर होत जातो.
सद्गुरु राजेंद्रदादांनी ‘दिवसभरात किती वेळा स्वेच्छेने वागतो ?’, असा मला अभ्यास करायला सांगितले. दोन आठवडे अभ्यास आणि चिंतन करवून घेतल्यावर त्यांनी मला असे प्रयत्न चालू ठेवण्यास सांगितले.
४ इ. स्वेच्छेवर मात करण्याचे प्रयत्न केल्यावर झालेले लाभ
१. मिळालेली सेवा सहजतेने स्वीकारणे आणि मनापासून करणे जमू लागले. ‘मिळालेल्या सेवेतून गुरुदेवांना आपल्याला काय शिकवायचे होते ?’, असे चिंतन होऊ लागल्याने त्यातील थोडाफार आनंद अनुभवता येऊ लागला.
२. ‘स्वेच्छेने वागल्याने मी स्वतःला आणि इतरांना किती दुःखी करतो’, हे मला प्रकर्षाने जाणवू लागले. मला घरातील सदस्यांच्या मनाप्रमाणे वागणे थोडेफार जमू लागल्याने त्यांना आणि परिणामी मलाही घरात आनंद वाटू लागला.
३. लहान-सहान गोष्टी, सेवा आणि घरातील प्रसंग यांंतील ताण जाऊन प्रत्येक प्रसंग मला लगेच स्वीकारता येऊ लागला आहे.
४. स्वेच्छेने वागण्याविषयी आता मन सतर्क झाले आहे आणि परेच्छेने वागल्याने साधक अन् कुटुंबीय यांच्याशी जमवून घेता येऊ लागले आहे.
सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या आढाव्यात बसल्याने आणि ते देत असलेल्या गृहपाठामुळे मला अन् माझ्यासारख्या अनेक साधकांना जीवनातील आध्यात्मिक आनंद अनुभवता येऊ लागला आहे. ‘कृपाळू गुरुमाऊलीने मोठी कृपा करून आम्हा साधकांना वेगळ्याच भावविश्वात नेले आहे’, असे मला वाटते.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
मला पूर्वी सद्गुरु राजेंद्रदादांविषयी आदरयुक्त भीती वाटत असे. आता ते घेत असलेल्या आढाव्यात बसल्यानंतर ‘सद्गुरु राजेंद्रदादांच्या रूपातून माझी गुरुमाऊली मला सतत भेटते आणि माझ्यावर कृपावर्षाव करते’, असे मला जाणवते. त्यांच्या प्रीतीमुळे त्यांचे माझ्याशी अंतरीचे नाते असल्यासारखे वाटते. त्याविषयी मी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून ‘सद्गुरु राजेंद्रदादांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मला तंतोतंत कृती करता येऊ दे’, अशी मी कळकळीची प्रार्थना करतो.’
– गुरुचरणांच्या प्राप्तीसाठी आतुरलेला, श्री. पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.७.२०१८)
‘आळस’ या स्वभावदोषामुळे जीवनातील साधनेचा अमूल्य वेळ कसा वाया जातो ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शनसद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले, ‘‘प.पू. गुरुदेवांनी ‘वर्ष १९९९ ते २०२२ या २४ वर्षांत १ सहस्र वर्षांची साधना होणार आहे’, असे सांगितले आहे, म्हणजेच १ वर्षात साधना केल्यास (१०००/२३ ) ४३.५ वर्षांची साधना होणार आहे. असा हिशोब केला, तर १ मिनिट वाया घालवणे, म्हणजे जीवनातील ४३.५ मिनिटे आणि १ घंटा, म्हणजे ४३.५ घंटे वाया घालवण्यासारखे आहे; म्हणूनच आपल्याला सांगितले आहे, ‘एक क्षणही साधकांनो आता नको दवडायला ।’ आता घोर आपत्काळ येत आहे, तर जलद गतीने साधना करायला हवी.’’ १. ‘आळस’ या स्वभावदोषाविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली काही महत्त्वाची सूत्रे अ. ‘आळस’ हा एकटा कधीच नसतो. तो समवेत अन्य स्वभावदोषांचा गट घेऊनच फिरतो. त्यामुळे त्याचा साधनेवर गंभीर परिणाम होतो. आ. ‘आज्ञापालन’ हा जसा गुणांचा राजा आहे, तसा ‘आळस’ हा स्वभावदोषांचा राजा आहे. इ. ‘आळस’ हा स्वभावदोष साधनेतील मोठा ‘स्पीडब्रेकर’ आहे. तो १० – १० पावलांवर उफाळून येत असल्याने साधनेची गाडी लवकर पुढे जात नाही. ई. ‘आळस’ हा स्वभावदोष आपल्याला साधनेत गतीने खाली आणतो. उ. विजिगीषू वृत्ती असल्यावरच सर्वंकष प्रभाव टाकणार्या ‘आळस’ या स्वभावदोषावर मात करणे शक्य आहे. ऊ. ‘आळस’ या स्वभावदोषावर मात करण्यासाठी लढाऊ वृत्ती वाढवली पाहिजे आणि प्रार्थनाही केली पाहिजे. ए. स्वतःचे नियोजन करून आणि त्याचे तंतोतंत पालन करून आळसावर मात करू शकतो. ऐ. जिथे आळसामुळे प्रयत्न होत नाहीत, तिथे शिक्षा पद्धतीचे अवलंबन करावे. ओ. आळसामुळे आपण जीवनातील साधनेचा अमूल्य वेळ वाया घालवत असतो. ‘वेळ अमूल्य कसा आहे !’, हेही त्यांनी समजावून सांगितले. अशा प्रकारे सद्गुरु राजेंद्रदादांनी ‘आळस’ या स्वभावदोषाचे गंभीर परिणाम सांगून ‘त्यावर कसे प्रयत्न करायचे ?’, हेही सांगून माझ्यावर कृपाच केली. २. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘आळस’ या स्वभावदोषाच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे चालू केल्यावर झालेले लाभ अ. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये काही प्रमाणात होणारा चढ-उतार उणावून आता त्यात सातत्य येऊ लागले आहे. आ. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमधून आनंद अनुभवता येऊ लागला. इ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत असल्यास, त्याची खंत वाटून नव्याने प्रयत्न चालू करायला उत्साह वाटू लागला आहे. ई. ‘प्रयत्न मनापासून केल्यास देव १०० टक्के साहाय्य करतोच’, याची मला मनोमन जाणीव झाली आणि ‘प्रयत्न केले, तरी होत नाही’ असे जेव्हा वाटते, तेव्हा प्रयत्नांमधील उणिवा लक्षात येऊ लागल्या. उ. ‘आळस, सवलत घेणे आणि चालढकलपणा’ या स्वभावदोषांनी डोके वर काढताच त्याची जाणीव होऊन त्यांवर मात करणे शक्य होऊ लागले. ऊ. ‘शरीर आणि मन यांवरील ताण उणावला असून हलकेपणा आला आहे’, असे वाटत आहे. |
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची अभिनव पद्धत !१. सद्गुरु राजेंद्रदादा साधकाची प्रकृती, विचारप्रक्रिया, साधकाची देहबोली, त्याचा आश्रमातील वावर यांचा अभ्यास करून त्या साधकाला मूळ स्वभावदोष आणि अहंच्या पैलूकडे नेतात, तसेच ‘त्यांवर मात करण्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’, हे ते प्रायोगिक स्तरावर समजावून सांगतात. २. ते साधकांना प्रश्न विचारून आणि गृहपाठ देऊन साधकांना अयोग्य कृती आणि विचार यांवर लक्ष ठेवायला शिकवतात. ३. ते साधकांना चिंतन करायला लावून त्यांना मूळ स्वभावदोष आणि अहंच्या पैलूंपर्यंत नेतात. ते साधकांना ‘त्यावर प्रयत्न कसे करायचे ? प्रत्यक्ष कृती कोणत्या करायच्या ?’, याविषयी सांगतात. ४. साधकांना चिंतन, अभ्यास आणि योग्य कृती यांमुळे स्वभावदोष अन् अहंच्या पैलूवर मात करणे जमू लागते आणि ते आनंद अनुभवू लागतात. ५. ‘आढावा देणे’, ही आनंददायी प्रक्रिया आहे’, हे सद्गुरु राजेंद्रदादांच्या आढाव्यामुळे प्रकर्षाने जाणवते. ‘साधकांनी स्वतःत पालट करावा’, यासाठीच्या त्यांच्या तळमळीमुळे साधक कृतीप्रवण होतात. ६. सद्गुरु राजेंद्रदादा लहान आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन विषय पटवून देतात. ७. ते सहज सुलभ पद्धतीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसारखा गंभीर विषय आनंददायी करतात. ८. ‘सद्गुरु राजेंद्रदादा आणि त्यांच्या आढाव्यातील सूत्रे यांविषयी कितीही लिहिले, तरी अल्पच आहे’, असे मला वाटते. |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |