रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावू नका ! – कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाचे परिपत्रक

यात परिपत्रक काढण्यासारखे काय आहे ? सर्वोच्च न्यायालयाचाच हा नियम आहे. जर त्याचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्‍या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील ध्वनीप्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावण्यास निर्बंध घालणारे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत राज्यात दर्गा आणि मशिदी येथे ध्वनीक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच दिवसा ध्वनीक्षेपक लावतांना त्याचा आवाज हा ‘एअर क्वालिटी’च्या मानकांनुसार असावा, त्या दृष्टीने सतर्कता बागळण्याचा निर्देशही देण्यात आला आहे. मशिदीच्या जवळपास कानठळ्या बसवणारे फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

वक्फ बोर्डाने मशीद परिसर आणि राज्यात ठिकठिकाणी झाडे लावण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ‘फळे आणि सावली देणारे वृक्ष जागोजागी लावा, तसेच उन्हाळ्यात पशू पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून जागोजागी पाण्याच्या टाक्या लावा’, असे बोर्डाने म्हटले आहे. तसेच मशीद परिसरातील भिकार्‍यांची संख्या रोखण्यासाठी भिकार्‍यांचे समुपदेशन करण्याचे निर्देशही या परिपत्रकातून देण्यात आले आहे.