परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. १७ मार्च या दिवशी ‘व्यष्टी साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग १०
भाग ९ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459876.html
६. व्यष्टी आणि समष्टी साधना !
६ अ. सेवेची पुष्कळ तळमळ असल्यामुळे व्यष्टी साधनेकडे लक्ष दिले जात नसेल, तर दोन्हीचे महत्त्व समजून घ्या !
पहिला साधक : परात्पर गुरुदेव, अध्यात्मप्रसारासाठी प्रवास करतो, तेव्हा सेवेविषयी पुष्कळ तळमळ असते; परंतु त्या वेळी व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होऊ लागते.
परात्पर गुरु डॉक्टर : व्यष्टी साधना हा समष्टी साधनेचा पाया आहे. व्यष्टी साधना चांगली केली, तर आपल्या वाणीमध्ये चैतन्य येते. आपण समाजात जाऊन समाजाला साधना सांगतो, तेव्हा आपल्यातील चैतन्यामुळे लोकांवर पुष्कळ प्रभाव पडतो. आपले जे ध्येय आहे, ‘सर्व ठिकाणी सात्त्विक लोकांची निर्मिती करायची’, ते साध्य होऊ लागते. असे केल्याने समष्टी साधनाही चांगली होईल. कुणी ध्यान लावतो. पूर्वी ऋषिमुनी त्यांना ईश्वरप्राप्ती करायची आहे; म्हणून पाचशे, सहस्रो वर्षें ध्यान लावून बसत होते. ही त्यांची व्यष्टी साधना झाली. समष्टी साधना चांगली असण्याचे महत्त्व कोणते आहे ? जे समष्टी साधना करतात, ते ईश्वराला प्रिय, आपले वाटतात ? कारण भगवंतसुद्धा अनंत कोटी ब्रह्मांडांची काळजी घेत असतो. समष्टीवर प्रेम करणे, समष्टीसाठी सर्वकाही करणे, हा ईश्वराचा गुण आहे. तो गुण आपल्यामध्ये लवकर येतो आणि आपण ईश्वराचे प्रिय बनतो. हे सर्व स्वयंसूचनेमध्ये घ्या. आता जे बोललो, ते सर्व स्वयंसूचनेमध्ये घ्या.
६ आ. प्रकृतीनुसार व्यष्टी साधना आणि समष्टी साधना कुणी करायचे आहे, हे ठरलेले असते !
दुसरा साधक : परात्पर गुरुदेव, जेव्हा मी येथे रामनाथी आश्रमात होतो, तेव्हा व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत होते; परंतु वाराणसीला गेल्यानंतर समष्टी साधनेचे विचार रहातात. सेवा करण्याचे विचार अधिक असतात. जसे येथे प्रयत्न करत होतो, त्या तुलनेत व्यष्टी साधनेत पुष्कळ अल्प पडतो; परंतु यापूर्वी प्रक्रियेच्या माध्यमातून व्यष्टी साधना शिकायला मिळाली होती, ती आतून चालू रहाते.
परात्पर गुरु डॉक्टर : पुष्कळ छान !
दुसरा साधक : मागील वेळी मला कुणी काही सांगितले, तर प्रथम एक मिनिटापर्यंत लक्षातच यायचे नाही. आता मला ते तात्काळ लक्षात येत आहे. त्याची जाणीव आतून असते; परंतु जे प्रतिदिन साधनेसंबंधी चुकांची सारणी लिहिणे आणि स्वयंसूचनांची सत्रे करणे, याचे प्रमाण पुष्कळ अल्प होते.
परात्पर गुरु डॉक्टर : अल्प का होते ? ज्याचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहे, ते आपण करतोच. समजा कुणाला मधुमेह झाला आहे आणि त्याला ‘इन्सुलिनचे (मधुमेहाचे एक औषध) इंजेक्शन प्रतिदिन घ्यायचेच आहे’, हे ठाऊक आहे. अशी मधुमेह पीडित व्यक्ती एक दिवस रात्री १२ वाजता घरी आली आणि तिच्या लक्षात आले की, उद्या सकाळसाठी इन्सुलिन नाही, तर कोणत्या औषधविक्रेत्याचे (केमिस्टचे) दुकान उघडे आहे ?’, हे ती शोधत शोधत जाते. तिला इन्सुलिनचे महत्त्व माहिती असते. तुम्ही स्वयंसूचनेमध्ये ‘व्यष्टी साधनेचा लाभ काय आहे’, यावरच एक सूचना द्या. असे केल्यावर काही मास लागतील; परंतु साधनेचे लाभ चित्तावर कोरले गेले, तर नंतर आपोआपच व्यष्टी साधनेसंबंधी कृती होतील.
सर्वांची प्रकृती वेगवेगळी असते. कुणाची प्रकृती व्यष्टी साधनेला अनुकूल असते, तर कुणाची समष्टीला साधनेला अनुकूल असते. साधनेचे मार्ग वेगवेगळे आहेत, उदा. भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग असे शेकडो मार्ग आहेत. तसेच प्रकृतीचे असते. ज्याची समष्टी प्रकृती आहे, जशी तुमची प्रकृती समष्टी आहे, त्यांना समष्टी सेवेमध्ये अधिक आनंद मिळतो. ज्याची व्यष्टी प्रकृती आहे, त्याला घरात बसून ध्यान लावून बसणे, नामजप करत बसणे यांमध्ये आनंद मिळतो. आपल्या प्रकृतीनुुसार साधना केली, तर जलद प्रगती होते. व्यष्टी साधनेची प्रकृती असणार्याला म्हटले, ‘समष्टीत जा’ आणि समष्टी साधनेची प्रकृती असणार्याला म्हटले, ‘तू व्यष्टी साधना कर’, तर ते योग्य होत नाही. तुम्ही ती चिंता करू नका. ईश्वराच्या दृष्टीनेसुद्धा जे समष्टीत जातात, ते सर्व ईश्वराला आपले वाटतात. त्यामुळे समष्टी प्रकृती असणार्यांची साधनेत लवकर प्रगती होते. त्याचसमवेत प्रतिदिन एक घंटा नामजप झालाच पाहिजे. त्यामुळे वाणीत चैतन्य येते. ‘न्यूनतम एक घंटा नामजप करायलाच पाहिजे’, असा निश्चय करा. न्याहारीच्या आधी १५-२० मिनिटे नामजप केला, जेवणापूर्वी १५-२० मिनिटे, असे दिवसभरात ३-४ वेळा करा आणि नंतर कसे होईल, ते तुम्हालाच आढळून येईल, बाहेर प्रसारासाठी गेल्यावर त्याचा पूर्वी जेवढा प्रभाव होता, त्यापेक्षा दुप्पट प्रभाव आता पडेल.
(क्रमश:)