अंतर्यामी श्रीगुरूंच्या मार्गदर्शनानुसार कृती केल्याने प्रवचन घेण्याच्या सेवेची सिद्धता नसतांना ऐन वेळी उत्तम प्रवचन करता येणे
१. घरी कार्यक्रमानिमित्त पाहुणे आले असल्याने प्रवचन घेणे शक्य नसणे; मात्र अन्य साधकाचे नियोजन करूनही त्याला अडचण आल्याने स्वतःलाच प्रवचनाला जावे लागणे
‘१२.५.२०१८ या दिवशी संध्याकाळी ६ वाजता लांजा येथील एका गावामध्ये असलेल्या एका कार्यक्रमात ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती’ या विषयावरील प्रवचन आयोजित केले होते. त्या दिवशी आमच्या घरी एका कार्यक्रमानिमित्त पाहुणे आले असल्याने ‘मला ते प्रवचन करायला जमणार नाही’, असे मी उत्तरदायी साधकांना सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रवचन घेण्यासाठी दुसर्या साधकाचे नियोजन केले; पण त्या साधकाला त्याच्या कार्यालयात अडचण आल्याने त्याचे प्रवचनाला जाणे रहित झाले. त्यामुळे उत्तरदायी साधकांनी मला संपर्क करून ‘तुम्हालाच प्रवचनासाठी जावे लागेल’, असा निरोप दिला.
२. प्रवचन करण्याची कोणतीच सिद्धता नसतांना ‘मी आहे ना तुझ्या पाठीशी ! प्रवचन घेणारा तू कुठे आहेस ?’, असे अंतर्यामी गुरुमाऊलीने आश्वस्त केल्यावर ताण दूर होणे
त्या वेळी मी अंतर्यामी असलेल्या गुरुमाऊलीला विचारले, ‘आता काय करायचे ?’ तेव्हा आतून ‘साधनेला पहिले प्राधान्य असल्याने प्रवचनाला जायला पाहिजे’, असे उत्तर आले. प्रवचन करणे आवश्यक होते; परंतु माझी प्रवचन घेण्याची कोणतीच सिद्धता झाली नव्हती. ‘संहिता वाचन केलेले नसतांना प्रवचन कसे करू ?’, असे मी परत विचारल्यावर उत्तर आले, ‘मी आहे ना तुझ्या पाठीशी ! प्रवचन करणारा तू कुठे आहेस ?’ गुरुमाऊलीने असे आश्वस्त केल्यावर मी कोणताही ताण न घेता प्रवचनस्थळी पोचलो.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने प्रवचन उत्तम होणे आणि सर्व ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राचा विषय चांगला समजल्याचे सांगणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करून प्रवचनाला आरंभ केला. प्रवचन उत्तम झाले. मला या सेवेतून आनंद मिळाला. उपस्थित सर्व ग्रामस्थांना प्रवचन आवडले आणि तेथे माझा सत्कार करतांना त्यांनी मला सांगितले, ‘‘हिंदु राष्ट्राचा विषय आम्हाला चांगला समजला !’’
या प्रवचनाच्या माध्यमातून ‘कर्ते करविते आणि साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, याची त्यांनीच मला पदोपदी अनुभूती दिली. त्यासाठी मी श्रीगुरुचरणी समर्पित आणि कृतज्ञ आहे.’
– श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी (२७.५.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |