स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे श्री. नरेंद्र सुर्वे यांच्यात झालेले पालट !
‘श्री. नरेंद्र सुर्वे यांना मी वर्ष २०११ पासून ओळखते. वर्ष २०१३ पासून आम्ही जवळपास दीड वर्ष एकत्र चाकरी केली आहे. तेव्हा ते माझे वरिष्ठ अधिकारी होते.
१. साधकाविषयी साधिकेच्या मनात असलेली पूर्वपीठिका
नरेंद्रदादांना केवळ सेवाच करायला आवडत असे. त्या वेळी ते मला म्हणत, ‘‘नामजपादी उपाय, व्यष्टी साधनेचे लिखाण, भाववृद्धी होण्यासाठी करायचे प्रयत्न, व्यष्टी आढावा या गोष्टी मला कधीही जमणार नाहीत.’’ तसेच ‘त्यांच्यात पुष्कळ बुद्धीमत्ता आणि इतर गुण असल्यामुळे त्यांना त्या सर्वांचा अहं होता’, असे मला जाणवत असे.
२. साधकाने पूर्णवेळ साधना चालू करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात जाणे अन् प्रक्रियेमुळे होणारा संघर्ष कथन करणे
६ – ७ मासांपूर्वी दादांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेऊन ते स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात गेले. प्रक्रियेच्या आरंभी स्वयंपाकघरात भाजी चिरणे, केर काढणे, भांडी घासणे इत्यादी सेवा करतांना दादांचा प्रचंड संघर्ष झाला. त्या कालावधीत मी दादांना संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मनाचा झालेला संघर्ष अगदी प्रांजळपणे सांगितला होता. हे सर्व कठीण वाटत असूनही दादा ‘आता देव काय ते करवून घेईल’, या श्रद्धेने आणि चिकाटीने प्रयत्न करत राहिले.
३. काही मासांत साधकाच्या बोलण्यात भावाच्या स्तरावर पालट झाल्याचे जाणवणे
आज काही मासांनंतर मी दादांना संपर्क केला असता, ते सेवेसाठी देहली येथे गेले असल्याचे समजले. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांचे बोलणे पूर्णतः भावाच्या स्तरावर होते’, असे मला जाणवले. तेव्हा दादांचे बोलणे ‘देवाने कसे शिकवले ? देव कशी सेवा करवून घेत आहे ? काय शिकायला मिळत आहे ? देव किती आनंद देत आहे, किती कृतज्ञता व्यक्त करावी’, अशा आशयाचे होते. दादांनी कार्याऐवजी साधना, देव या विषयावर बोलणे, हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यांना मी याविषयी सांगितले असता ते म्हणाले, ‘‘मला काही कळत नाही, देवालाच माहिती !’’
४. ‘देवाला काहीही शक्य आहे’, याची प्रचीती येणे
याआधी ‘दादा आणि भाव’, असे कधीही होऊ शकत नाही’, असे मला वाटायचे; पण ‘देवाला काहीही शक्य आहे’, हे सद्गुरु राजेंद्रदादा शिंदे यांचे वाक्य आणि या प्रक्रियेला परम पूज्य गुरुदेवांची असलेली संकल्पशक्ती यांची आठवण आली.
५. कृतज्ञता
केवळ ४ मास रामनाथी आश्रमात प्रक्रियेचे प्रयत्न केल्यानंतर दादांमध्ये इतका पालट झाला. दादांमधील या पालटामुळे परम पूज्य गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया शिकवल्यामुळे अन् या जन्मी असे महान श्रीगुरु दिल्याविषयी कोटीशः कृतज्ञता वाटली.
‘हे गुरुदेवा, तुम्ही शिकवलेली प्रक्रिया गांभीर्याने, चिकाटीने आणि तळमळीने करून शीघ्रतेने आम्हा सर्व साधकांना तुम्हाला अपेक्षित असे घडता येऊ दे, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |