परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या खोलीत ‘सप्तशती’ पाठाचे अनुष्ठान करतांना श्री. अमर जोशी यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या खोलीत ‘सप्तशती’ पाठाचे अनुष्ठान करतांना सनातन पुरोहित पाठशाळेतील साधक श्री. अमर जोशी यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ‘सप्तशती पाठा’चे अनुष्ठान करतांना खोलीतील देवीच्या चित्रासमोरील लाद्या इतर लाद्यांच्या तुलनेत उष्ण (गरम) लागणे
‘चैत्रातील नवरात्रीच्या निमित्ताने मला परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या खोलीत प्रतिदिन ‘सप्तशती पाठा’चे अनुष्ठान करण्याची संधी मिळाली होती. ‘सप्तशती पाठा’चे वाचन करतांना देवीचे चित्र ठेवले होते, त्या जागेच्या समोरची लादी अन्य लाद्यांच्या तुलनेत उष्ण (गरम) लागत होती. या लादीपासून सरळ म्हणजे पश्चिम दिशेकडील आणि तिरक्या म्हणजे नैऋत्य दिशेकडील काही लाद्या अल्प प्रमाणात उष्ण लागत होत्या अन् उर्वरित लाद्या सामान्य तापमानाच्या होत्या. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवसापासून प्रतिदिन देवीसमोरील लादीचे तापमान अधिकाधिक वाढत गेले, तसेच पूर्वेकडील आणि नैऋत्येकडील अल्प प्रमाणात उष्ण होणार्या लाद्यांची संख्याही प्रतिदिन वाढत होती. अनुष्ठानाच्या आठव्या दिवशी खोलीतील सगळ्याच लाद्या उष्ण लागत होत्या; परंतु खोलीचा उंबरठा ओलांडल्यावर खोलीबाहेरच्या मार्गिकेत असलेल्या लाद्या मात्र सामान्य तापमानाच्याच होत्या.
२. गुरुदेवांच्या सांगण्यानुसार त्यांची पादत्राणे घातल्यावर भट्टीत पाय ठेवल्याप्रमाणे पाय गरम होणे आणि ती घालून फरशीवर चालल्यावर वाळवंटातील तापलेल्या वाळूतून चालल्याप्रमाणे पाय पोळणे
एकदा परात्पर गुरुदेवांनी मला त्यांची खोलीत वापरण्याची पादत्राणे घालून खोलीत चालण्यास सांगितले. तेव्हा माझ्या मनात प्रथम विचार आला, ‘या तर परात्पर गुरुदेवांच्या पादुका आहेत. यांची धूळ होण्याचीही माझी पात्रता नाही, तर मग मी त्यांना पाय कसा लावू ?’ या विचाराने मी त्या घालण्यास संकोच करत होतो; मात्र गुरुदेवांनी लगेच पादत्राणे काढून माझ्यासमोर सरकवली आणि ‘प्रयोग करून बघ’, असे मला सांगितले. त्यामुळे ‘गुर्वाज्ञा’ प्रमाण मानून आणि त्या गुरुपादुकांना मनोमन नमस्कार करून मी ती पादत्राणे घातली. मी त्या पादुका पायांत घातल्यावर एखाद्या भट्टीमध्ये ठेवल्याप्रमाणे माझे पाय गरम झाले. मी त्या पादुका घालून उष्ण झालेल्या लाद्यांवर चालण्याचा प्रयोग केला. तेव्हा ‘मी जणू वाळवंटातील तापलेल्या वाळूवरूनच चालत आहे’, असे मला वाटत होते, इतके माझे पाय भाजत (पोळत) होते.
३. अनुष्ठानाच्या वेळी देवी आणि असुर यांच्यातील युद्धाचा परात्पर गुरुदेवांच्या खोलीतील वातावरणावर अत्यंत परिणाम होऊन गुरुदेवांना त्रास होणे आणि तरीही त्यांनी सतत शिकण्याच्या स्थितीत राहून त्यावर संशोधन करणे
या अनुष्ठानाच्या वेळी ‘देवी आणि असुर यांच्यातील युद्धाचा परात्पर गुरुदेवांच्या खोलीतील वातावरणावर किती प्रखरतेने परिणाम होतो !’, हे माझ्या लक्षात आले. याचा परात्पर गुरुदेवांना पुष्कळ त्रास होतो; परंतु तरीही ते त्यातून शिकून त्यावर संशोधन करत असतात. तेव्हा मला ‘त्यांच्यात किती जिज्ञासा आहे !’, हे शिकायला मिळाले.
४. गुरुदेवांची पादत्राणे घालतांना मनाची झालेली द्विधा अवस्था श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी योग्य दृष्टीकोन देऊन ‘‘आपले गुरु स्वतःच्या पादुकाही शिष्याला घालायला देतात’’, असे सांगून गुरूंची महानता लक्षात आणून देणे
हा प्रसंग आणि पादत्राणे घालतांना माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘बघा ना, आपले गुरु किती सहजावस्थेत असतात ! आपल्या पादुकाही ते सहजतेने दुसर्यांना घालायला देतात. त्रैलोक्यात शोधले, तरी असे गुरु कुठेच मिळणार नाहीत.’’ पुढे मला दृष्टीकोन देतांना त्यांनी सांगितले, ‘‘गुरुदेवांनी त्यांची पादत्राणे घालायला सांगितली, तर त्या क्षणी ते आज्ञापालन म्हणून करणेच योग्य आहे. त्या संशोधनातून शिकणे त्यांना अपेक्षित असते.’’ हे ऐकल्यावर गुरुपादुकांना पाय लावल्यावर माझ्या मनाची झालेली द्विधा मनस्थिती न्यून झाली आणि ‘गुरूंनीच माझ्याकडून योग्य कृती करवून घेतली’, यासाठी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
५. परात्पर गुरुदेवांच्या खोलीत अनुष्ठानाच्या वेळी अधिक उष्णता असूनही तेथे अनुष्ठान करतांना साधकाला नेहमी होत असलेला उन्हाळ्याचा त्रास न्यून होणे आणि परात्पर गुरुदेवांना हे सांगितल्यावर त्यांनी त्याचे सर्व श्रेय देवीलाच देणे
अनुष्ठान चालू असतांना (आणि इतर वेळीही) आश्रमातील अन्य खोल्यांच्या तुलनेत परात्पर गुरुदेवांंच्या खोलीत अधिक प्रमाणात उष्णता जाणवते. माझी पित्तप्रकृती असल्याने मला उन्हाळ्याचा त्रास अधिक प्रमाणात होतो; परंतु मला परात्पर गुरुदेवांच्या खोलीत ‘सप्तशती’च्या पाठाचे अनुष्ठान करतांना उष्णतेचा त्रास झाला नाही. मी परात्पर गुरुदेवांंना ही अनुभूती सांगितल्यावर त्यांनी ‘‘देवी आपल्या भक्ताचे रक्षण करतेच’’, असे म्हणून सगळे श्रेय देवीलाच अर्पण केले.
६. साधकाला आलेली अनुभूती परात्पर गुरुदेवांच्या खोलीचे स्थानमहात्म्य अधोरेखित करत असल्याचे लक्षात येणे
मला आलेली वरील अनुभूती म्हणजे ‘परात्पर गुरुदेवांच्या खोलीचे स्थानमहात्म्य आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर अन्य एका उद्देशाने आश्रमाच्या सभागृहामध्ये मी ‘सप्तशती’च्या पाठाचे अनुष्ठान करायला बसत होतो. या वेळी मात्र मला नेहमी होणारे उष्णतेचे त्रास, उदा. घामोळ्या येणे इत्यादी बर्याच प्रमाणात झाले.
परात्पर गुरु डॉक्टरांंच्या खोलीतील अनुष्ठान सकाळी आरंभ होऊन भर दुपारी संपत असले, तरी मला उष्णतेचा त्रास होत नसे; मात्र सभागृहात अनुष्ठान करत असतांना मला तेथे उष्णतेचा पुष्कळ त्रास होत असे.
७. परात्पर गुरुदेवांच्या खोलीत ‘सप्तशतीच्या पाठा’चे अनुष्ठान करतांना झालेले आध्यात्मिक लाभ !
७ अ. परात्पर गुरुदेवांंच्या खोलीत अनुष्ठान करत असतांना तेथे त्यांचे स्थुलातून अस्तित्व असल्याने मन लगेच एकाग्र होऊन भावपूर्ण पठण करता येणे : मला इतर वेळी भावजागृतीचे प्रयत्न करतांना मन एकाग्र होण्यास पुष्कळ प्रयत्न करावे लागतात; परंतु मी परात्पर गुरुदेवांच्या खोलीत अनुष्ठान करत असतांना तेथे त्यांचे स्थुलातून अस्तित्व असल्याने मला भावजागृतीसाठी निराळे प्रयत्न करावे लागत नव्हते. अनुष्ठानासाठी बसल्यावर लगेच मन एकाग्र होऊन भावपूर्ण पठण करता आले, तसेच ही भावावस्था पुढेही काही घंटे टिकून राहून नंतरच्या सेवाही गुरूंच्या अनुसंधानात राहून करता आल्या.
७ आ. या अनुष्ठानापासून माझ्या मनाची चंचलता बर्याच प्रमाणात न्यून झाली आहे.
७ इ. माझ्या प्रार्थना आणि कृतज्ञता मनापासून अन् भावपूर्ण होण्याचे प्रमाण आधीच्या तुलनेत वाढले आहे.
‘परात्पर गुरुदेवांनी मला या अनुष्ठानाची संधी देऊन ते माझ्याकडून करवून घेतले आणि मला भावजागृतीचा प्रसाद दिला, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |