वाई (जिल्हा सातारा) येथे बाजार समितीवर शेतकर्‍यांचा मोर्चा

सातारा, १५ मार्च (वार्ता.) – वाई बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाल्याने लिलाव बंद करण्यात आले होते. हळदीचे लिलाव चालू करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी बांधवांनी वाई बाजार समितीवर मोर्चा काढला.

काही दिवसांपूर्वी वाई बाजार समितीमध्ये हळदीला २९ सहस्र रुपयांहून अधिक भाव प्राप्त झाला होता. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकर्‍यांनी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळद लिलावासाठी आणली. बाजार समितीच्या परिसरामध्ये अडत दुकानांमध्ये ८ ते १० सहस्र गोण्यांची आवक झाल्यामुळे मागील १ मास बाजार समितीने हळदीचे लिलाव बंद केले. १५ मार्च या दिवशी आठवडा बाजार असल्यामुळे हळदीचे लिलाव होतील, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती; मात्र लिलाव होण्याची चिन्हे न दिसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि शेतकरी बांधवांनी बाजार समितीवर मोर्चा काढला. या वेळी बाजार समितीचे सभापती, सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.

१० सहस्र रुपयांंपुढे हळदीची बोली काढावी, तसेच लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी वाई बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे केली. या वेळी ‘तातडीने व्यापार्‍यांची बैठक घेऊन हळदीचे लिलाव घेऊ’, असे आश्‍वासन पिसाळ यांनी शेतकर्‍यांना दिले.