आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्यास मारहाण
सातारा, १५ मार्च (वार्ता.) – वादग्रस्त पथकर नाका म्हणून ओळख असणार्या आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्यास अज्ञात टोळक्याने मारहाण केली आहे. या मारहाणीचे ध्वनिचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसारित झाले आहे.
१४ मार्चच्या रात्री पथकर नाक्यावरील कर्मचारी गाडीची नोंद घेत होते. तेव्हा एका वाहनचालकाने पथकरनाक्यावरील कर्मचार्याच्या अंगावर गाडी घातली. याचा जाब विचारण्यासाठी कर्मचारी गाडी जवळ गेला असता वाहनचालक महिला असल्याचे निदर्शनास आले. या महिला प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वेळी प्रवासी महिलेला साहाय्य करण्यासाठी अज्ञात टोळके पुढे आले आणि त्यांनी पथकर नाक्यावरील कर्मचार्यास मारहाण करण्यास प्रारंभ केला. रात्री उशिरापर्यंत भुईंज पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्याचे काम चालू होते.